भार्इंदरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: September 14, 2014 23:44 IST2014-09-14T23:44:17+5:302014-09-14T23:44:17+5:30
शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शहरात सध्या सुळसुळाट झाला असताना स्थानिक प्रशासन केवळ साट्यालोट्याच्या भूमिकेतून कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहे.

भार्इंदरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
राजू काळे, भार्इंदर
शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शहरात सध्या सुळसुळाट झाला असताना स्थानिक प्रशासन केवळ साट्यालोट्याच्या भूमिकेतून कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहे.
शहरात १२ लाखांवरील लोकसंख्येच्या आरोग्याची काळजी घेणे स्थानिक प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी पालिका मीरारोड येथील एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयासह ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरीकांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करीत आहे. मीरारोडचे रुग्णालय ५० खाटांच्या क्षमतेचे असले तरी ते अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. त्यामुळे प्रशासन नागरीकांच्या मोठ्या आजारांच्या उपचारासाठी सक्षम नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे शहरातील रुग्णांना त्वरीत उपचारासाठी खाजगी दवाखाने व रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात सध्या अद्ययावत खाजगी रुग्णालयांची संख्या वाढली असली तरी त्यातील उपचार खर्चांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सामान्य रुग्णांना तेथील उपचार परवडत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना माफक दरातील उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी शहरात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. बीएचएमएस (बॅचलर आॅफ होमियोपॅथी मेडीसीन अॅन्ड सर्जरी), एलसीईएच (लायसन्शीएट आॅफ दि कोर्ट आॅफ एक्झामिनर्स इन होमियोपॅथी) व डिएचएमएस (डिप्लोमा इन होमियोपॅथिक मेडिसीन अॅन्ड सायन्स) यांनी आपल्याला अॅलोपॅथीचा व्यवसाय सुरु करण्याची परवानगीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. परंतु, राज्य शासनाने अलिकडेच त्यांना अॅलोपॅथीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण करुनच तो व्यवसाय सुरु करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. परंतु, शहरातील अशा बहुतांशी पदवी धारकांकडून अॅलोपॅथीचा कोर्स पूर्ण न करताच तो व्यवसाय खुलेआम सुरु ठेवल्याचे ठिकठिकाणी थाटलेल्या दवाखान्यांत पहावयास मिळत आहे. यावर मात्र स्थानिक प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यात वैद्यकीय उपचाराबाबत अज्ञान असलेले सामान्य रुग्ण भरडले जात आहेत.