कांस्यपदक विजेत्यांचे जल्लोषी स्वागत

By Admin | Updated: August 7, 2014 00:41 IST2014-08-07T00:41:04+5:302014-08-07T00:41:42+5:30

कुरुंदवाडमध्ये मिरवणूक : मिरवणूक मार्गावर खेळाडूंचे औक्षण

Bronze medal winners welcome | कांस्यपदक विजेत्यांचे जल्लोषी स्वागत

कांस्यपदक विजेत्यांचे जल्लोषी स्वागत

कुरुंदवाड : ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या तीनही खेळाडूंचे आज, बुधवारी दुपारी त्यांची जन्मभूमी असलेल्या कुरुंदवाडमध्ये नागरिकांनी अभूतपूर्व स्वागत केले. यावेळी पारंपरिक वाद्यांसह शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी येथील जैन सांस्कृतिक भवनामध्ये जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रकुल स्पर्धेत येथील हर्क्युलस जिमचे खेळाडू चंद्रकांत माळी, गणेश माळी, ओंकार ओतारी यांनी कांस्यपदक मिळवून कुरुंदवाड शहराचे नाव सातासमुद्रापार केले आहे. या स्पर्धेसाठी वेटलिफ्टिंग प्रकारात देशातून एकूण आठ वेटलिफ्टरची निवड करण्यात आली होती. त्यापैकी तिघेजण या शहरातील असल्याने व तिघेही विजेते झाल्याने शहराच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. त्यामुळे त्यांचे शहरात आगमन होताच जल्लोषी स्वागत करण्याचा निश्चय सत्कार सोहळा समितीच्यावतीने केला होता.
दुपारी साडेतीनच्या सुमारास हर्क्युलस जिममध्ये खेळाडूंचे आगमन झाले. याठिकाणी नगराध्यक्ष संजय खोत, उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, बांधकाम सभापती वैभव उगळे, सत्कार समिती अध्यक्ष बी. डी. सावगावे, मुख्याधिकारी अतुल पाटील, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, कुरुंदवाड अर्बन बॅँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, जिमचे प्रमुख प्रदीप पाटील, विजय माळी, सुनील सुतार, विष्णुपंत माळी, सदाशिव माळी यांच्यासह माळी व ओतारी कुटुंबिय उपस्थित होते.
प्रारंभी दोन्ही कुटुंबीयांच्यावतीने खेळाडूंचे औक्षण करून जिममध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी या खेळाडूंचा जिमच्यावतीने सत्कार केल्यानंतर फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमधून मिरवणुकीला सुरुवात झाली.
ही मिरवणूक सुमारे तीन तासांहून अधिक काळ सुरू होती. या खेळाडूंच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरवासीयच रस्त्यावर उतरल्याने शहराला माणसांचाच पूर आला होता. मिरवणुकीची सांगता येथील जैन सांस्कृतिक भवनात करण्यात आली.

आनंदाला उधाण
मिरवणुकीत विविध वाद्यांसह संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील मिरवणुकीचा रस्ता माणसांनी फुलून गेला होता. खेळाडूंच्या या कर्तृत्वाने भारावून गेलेले शहरवासीय चौकाचौकांत खेळाडूंच्या स्वागताचे डिजिटल फलक लावून त्यांचे स्वागत करत होते, तर काही उत्साही कार्यकर्ते चौकाचौकांत नाचून आनंद व्यक्त करत होते. मिरवणूक येथील नगरपालिका चौकात येताच शहरवासीयांच्या जल्लोषी स्वागताने भारावून गेलेले तीनही खेळाडू मिरवणुकीतील जीप सोडून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होऊन नाचू लागल्याने शहरवासीयांचा उत्साह अधिकच वाढला.

Web Title: Bronze medal winners welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.