बोरीवलीत तोतया विमा एजंटला अटक
By Admin | Updated: March 3, 2015 01:34 IST2015-03-03T01:34:40+5:302015-03-03T01:34:40+5:30
आपली वाहन विमा पॉलिसी तपासून पाहा, असे आवाहन सध्या बोरीवली पोलिसांकडून मुंबईकरांना करण्यात येत आहे.

बोरीवलीत तोतया विमा एजंटला अटक
मुंबई : आपली वाहन विमा पॉलिसी तपासून पाहा, असे आवाहन सध्या बोरीवली पोलिसांकडून मुंबईकरांना करण्यात येत आहे. कारण मोटारसायकल आणि कारच्या बनावट विमा पॉलिसी विकणाऱ्या एका तोतया एजंटला बोरीवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडून नामांकित विमा कंपन्यांचे बनावट कागदपत्रे, पॉलिसीचे पेपर, मुद्रांक पोलिसांनी हस्तगत केले असून गेली अनेक वर्षे तो अशाच प्रकारे लोकांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मयूर पारीख (३९) असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव असून तो बोरीवली पश्चिम परिसरात जयना सेल्स शॉप आणि टीव्हीएस सर्व्हिस सेंटर चालवतो. गेल्या अनेक वर्षांपासून पारीख हा फसवणुकीचा धंदा करत आहे. या प्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या विमा पॉलिसीची वैधता संबंधित विमा कंपन्यांकडून तपासून घ्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
बोरीवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारीख हा जयना शॉपमधून कार आणि मोटारसायकलची विक्री करतो. त्याचबरोबर त्याच्याकडून वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तो वाहनाचा विमादेखील उतरविण्यास सांगायचा. त्याच्याकडे असलेल्या संगणकात त्याने विमा पॉलिसीचा एक विशिष्ट फॉर्म तयार केला होता. एका ग्राहकाला त्याने अशीच बनावट कागदपत्रे दिली. ही बाब त्या ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेचच बोरीवली पोलीस ठाणे गाठले आणि पारीखविरोधात तक्र ार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पारीखच्या दुकानात धाड टाकत हे प्रकरण उघडकीस आणले. पोलिसांना त्याच्याकडची सर्व कागदपत्रे आणि मुद्रांक हे बनावट असल्याचे आढळून आले आहे.
आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, भारती एएक्सए आणि इफ्को टोकिओ या विमा कंपन्यांची बनावट कागदपत्रे या धाडीत सापडल्याचे बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन परोडवाड यांनी सांगितले. पारीख हा अशा प्रकारे बनावट पॉलिसी बनविणाऱ्या मोठ्या टोळीमध्ये सहभागी असण्याची शक्यता असल्याने विशेषत: कार आणि मोटारसायकलधारकांनी त्यांची विम्याची कागदपत्रे एकदा तरी पडताळून पाहावीत, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. विमा पॉलिसीचा क्रमांक हा आठ अंकी असतो. मात्र पारीखने ग्राहकांना सात अंकांच्या पॉलिसी विकल्या आहेत, तसेच त्याच्याकडे विमा एजंटचा परवानादेखील नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच्या संगणकाची हार्डडिस्क तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. अशी फसवणूक झालेल्यांनी बोरीवली पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)