Join us

रुग्ण-डॉक्टरांमध्ये स्मार्ट संवादासाठी ‘आभा’ प्रणाली आणणार; रुग्णाची माहिती मिळणार एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 10:47 IST

अनेकदा रुग्णांना आपल्याला नेमके काय झाले आहे, हे सांगता येत नाही. अशावेळी डॉक्टरांसाठी त्यांच्यावर उपचार करताना अनेक अडचणी येतात; मात्र आता रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये स्मार्ट संवाद घडणार आहे.

मुंबई : अनेकदा रुग्णांना आपल्याला नेमके काय झाले आहे, हे सांगता येत नाही. अशावेळी डॉक्टरांसाठी त्यांच्यावर उपचार करताना अनेक अडचणी येतात; मात्र आता रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये स्मार्ट संवाद घडणार आहे. कारण, सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती आणि उपचारविषयक नोंदी ‘आभा’ नावाच्या संगणकीय प्रणालीत नोंदविता येणार आहे. परिणामी, रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांसाठी अधिक सोपे होणार असून, रुग्णाची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.

केंद्राच्या आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेमध्ये सहभाग म्हणून महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागदेखील ‘पाथ’ (पीएटीएच) या संस्थेच्या मदतीने पालिकेच्या ११ विभागांमध्ये पथदर्शी उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाइन व्यासपीठावर आरोग्यविषयक नोंदींसह आरोग्यसेवेची माहिती अगदी सहज मिळू शकेल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

भारताच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ (एबीडीएम) हा उपक्रम हाती घेतला आहे. आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक (आभा), आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या नोंदी (एचपीआर), आरोग्य सुविधा नोंदी (एचएफआर) आणि ‘आभा ॲॅप्लिकेशन’ आदी महत्त्वपूर्ण बाबी आणि त्यावर आधारित सुविधांचा आरोग्य विभागाच्या या नवीन उपक्रमात समावेश असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

खासगी वैद्यकीय व्यायायिकांनी आयुष्मान भारत डिजिटल मोहीम प्रणाली स्वीकारावी, यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने डिजिटल प्रोत्साहन योजनाही सुरू केली आहे. ही योजना एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी, स्वतःची नोंदणी करणाऱ्या खासगी व्यावसायिकांना किमान निकषांची पूर्तता करावी लागेल. सर्व खासगी व्यावसायिकांनी  नोंदणी करावी.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

रुग्णांची डिजिटल माहिती वेगाने होणार संकलित

‘पाथ’ या संस्थेच्या मदतीने मुंबई पालिकेच्या ११ विभागांमध्ये डिजिटल माहितीचा हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेअंतर्गत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि सुविधांची नोंदणी केली जात आहे. आरोग्य व्यावसायिक आणि सुविधांची अनुक्र हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्टर आणि हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री या घटकांनुसार ही नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे रुग्णांची डिजिटल माहिती संकलित करता येईल.