Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हस्तलिखित दस्तऐवजांच्या नोंदी जगासमोर आणा’; डिजिटल नोंदणीसाठी 'हर घर दस्तक' मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:00 IST

या नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांची मूळ मालकी संबंधित संस्था, घराणी किंवा नागरिकांकडेच कायम राहील.

मुंबई - महाराष्ट्राच्या हस्तलिखित दस्तऐवजांच्या ऑनलाइन नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले. हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी ''हर घर दस्तक'' ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.

१ मे रोजी ''महाराष्ट्र दिना''चे औचित्य साधून, राज्यातील सर्व ग्रामसभेत हस्तलिखित नोंदणीचा विषय प्राधान्याने मांडण्याचे निर्देशही शेलार यांनी देत गावपातळीवरील हस्तलिखित स्वरूपातील स्थानिक वारसा जतन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल असे सांगितले.  जिल्हा व तालुकास्तरीय सविस्तर यादी तयार करण्यास सांगण्यात आले. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहातील बैठकीत ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, संचालक विभीषण चवरे उपस्थित होते. तर, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी सहभाग घेतला.

ज्ञानभारती ॲप विकसितशेलार म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशभरातील हस्तलिखित दस्तऐवजांचे जतन आणि डिजिटलायझेशन करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी ''ज्ञानभारती ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून राज्यातील हस्तलिखित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत. यामुळे भारताचा प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

दस्तऐवजांचे जतन हा मूळ हेतूस्थानिक पातळीवर हस्तलिखित दस्तऐवज उपलब्ध असलेल्या विविध संस्था, ऐतिहासिक घराणी, नागरिक, संघटना आणि कुटुंबे यांची पुढील ७ दिवसांत जिल्हा व तालुकास्तरीय सविस्तर यादी तयार करावी. या नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांची मूळ मालकी संबंधित संस्था, घराणी किंवा नागरिकांकडेच कायम राहील. केवळ दस्तऐवजांचे जतन करणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे, असे शेलार म्हणाले.

सर्वांनी योगदान द्यावेमहाराष्ट्राकडे हस्तलिखितांच्या स्वरूपात असलेला इतिहास हा अमूल्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडील ऐतिहासिक दस्तऐवज जागतिक स्तरावर नेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. हा केंद्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम असून यामध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Har Ghar Dastak' campaign: Digitize handwritten documents to showcase heritage globally.

Web Summary : Maharashtra is launching 'Har Ghar Dastak' to digitize handwritten documents, preserving cultural heritage. Minister Shelare emphasizes showcasing this heritage globally via the 'Dnyanbharti' app. The initiative, starting on Maharashtra Day, encourages local participation, ensuring document ownership remains with original owners. A detailed list of available documents will be created.