उमटे धरणावरील पूल कोसळला

By Admin | Updated: June 23, 2015 00:35 IST2015-06-23T00:35:56+5:302015-06-23T00:35:56+5:30

सतत बरसणाऱ्या पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाला बसला असून या धरणावरील पूल रविवारी सायंकाळी कोसळला

The bridge over the Umah dam collapsed | उमटे धरणावरील पूल कोसळला

उमटे धरणावरील पूल कोसळला

अलिबाग : सतत बरसणाऱ्या पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाला बसला असून या धरणावरील पूल रविवारी सायंकाळी कोसळला. त्यामुळे तेथे अडकलेल्या दोन तरुणांचे प्राण ग्रामस्थांनी वाचविले. एवढी मोठी आपत्ती कोसळली तरी सकाळपर्यंत या घटनेची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर असून धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरीत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडून काढले आहे. रविवारी देखील पावसाचा जोर कायम होता. अलिबागपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उमटे धरणावर अलिबाग गोकूळ नगर येथील काही तरुण पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन तरुण हे धरणाच्या जॅकवेलकडे जाणाऱ्या पुलावर उभे होते. त्याचवेळी त्यांना पूल तुटण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने जॅकवेलच्या दिशेने धाव घेतली. काही क्षणातच पूल कोसळला आणि दोन तरुण जॅकवेलवर अडकून पडले. आरडा-ओरडा झाल्यावर तेथे असणारे दत्ता ढवळे, मनोज शिर्के, मोरे यांच्यासह अन्य स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने दोन तरुणांचे प्राण वाचविले. स्थानिकांनी तत्परता दाखविल्याने दोनही तरुणांचे प्राण वाचले, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. (प्रतिनिधी)

Web Title: The bridge over the Umah dam collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.