अपघाताला पर्याय ब्रिकर्स सिग्नलचा
By Admin | Updated: January 28, 2015 22:58 IST2015-01-28T22:58:29+5:302015-01-28T22:58:29+5:30
मुंब्रा महामार्गावर गावालगत होणारे अपघात टाळण्याकरिता आयआरबीने ठिकठिकाणी ब्रिकर्सचे सिग्नल बसविण्यास सुरूवात केली आहे

अपघाताला पर्याय ब्रिकर्स सिग्नलचा
कळंबोली : मुंब्रा महामार्गावर गावालगत होणारे अपघात टाळण्याकरिता आयआरबीने ठिकठिकाणी ब्रिकर्सचे सिग्नल बसविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या महामार्ग ओलांडता येणार असल्याचा विश्वास आयआरबीकड़ून व्यक्त करण्यात आला आहे.
जेएनपीटी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, स्टील मार्केट, पनवेलची व्यापारपेठ या ठिकाणी मालाची ने-आण करण्याकरिता गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येतात. ही वाहने शिळफाट्याहून मुंब्रामार्गे कळंबोली जंक्शनकडे येतात. येथे ट्रक, ट्रेलरची संख्या सर्वाधिक असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्याचबरोबर वाहनांची वर्दळ आणि रूंदी कमी असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडतात. कळंबोली जंक्शन ते शिळफाटा या दरम्यान आजूबाजूला गावांची संख्याही जास्त आहे. त्याचबरोबर नावडे, रोडपाली, तळोजा या ठिकाणी सिडकोने नोड विकसित केले आहेत. परिणामी दोन्ही बाजूने महामार्ग ओलांडून स्थानिक रहिवाशांना जावे लागते. रस्त्यावर पथदिव्यांची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी समोरून किंवा पाठीमागून वाहने आल्याचे पादचाऱ्यांनी दिसत नाही.त्यामुळे पादचाऱ्यांना ठोकर दिलेल्या अनेक अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये शेकडो जणांना नाहक प्राणाला मुकावे लागले आहे. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून त्यामध्ये आयआरबीने सुध्दा भाग घेतला आहे. त्यानुसार कळंबोली सर्कल ते शिळ फाटा या दरम्यान ब्रिकर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.