लाचखोरांना ‘बुरे दिन’

By Admin | Updated: March 4, 2015 01:21 IST2015-03-04T01:21:43+5:302015-03-04T01:21:43+5:30

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत केलेल्या कारवायांचा हिशोब नुकताच जनतेसमोर ठेवला.

Bribery 'Bad Day' | लाचखोरांना ‘बुरे दिन’

लाचखोरांना ‘बुरे दिन’

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत केलेल्या कारवायांचा हिशोब नुकताच जनतेसमोर ठेवला. तो पाहून येत्या काळात राज्यातून भ्रष्टाचार, लाचखोरीचा नायनाट शक्य आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

एसीबीची जबाबदारी स्वीकारताच महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी लाचखोर, भ्रष्ट शासकीय अधिकारी, लोकसेवक, लोकप्रतिनिधींविरोधात धडक मोहीम उघडली. त्याचेच परिणाम म्हणून २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये लाचखोरीची प्रकरणे ५८३वरून १२४५वर गेली. या कारवायांमध्ये दुपटीने वाढ झाली असून अटक होणाऱ्या आरोपींची संख्याही वाढली.
या वर्षी पहिल्या दोन महिन्यांमध्ये एसीबीने गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला. २०१५च्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच एसीबीने राज्यात २१७ सापळे रचून २८४ आरोपी गजाआड केले. २८ फेब्रुवारीपर्यंत एसीबीने प्रत्येक दिवशी सरासरी ४ सापळे रचून किमान ५ आरोपींना बेड्या ठोकल्या.
कारवाया वाढल्या म्हणजे भ्रष्टाचार वाढला, असे म्हणायचे का, या प्रश्नावर एसीबीचे महासंचालक म्हणतात, भ्रष्टाचार, लाचखोरी कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. मात्र लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सर्वसामान्य जनता निर्भीडपणे पुढे आल्यास भ्रष्टाचार रोखणे शक्य आहे.
शासकीय अधिकाऱ्यांच्या नसानसात भिनलेली लाचखोरी वृत्तीची सवय झालेल्या सर्वसामान्य जनतेला जागृत करण्यासाठी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखालील एसीबीने गेल्या दीड वर्षापासून कसोशीने प्रयत्न केले. सर्वप्रथम तुम्ही तक्रार केली आणि त्यात तथ्य आढळले तर कारवाई होणारच, हा विश्वास जनतेला दिला. तक्रारी देण्यातल्या जाचक अटी-नियम एसीबीने शिथिल केले, त्यात सुलभता आणली. आता फोनवरूनही तोंडी तक्रार देता येते. अशा प्रकारे दिलेल्या अनेक तक्रारींमध्ये एसीबीने लाचखोर अधिकाऱ्यांना गजाआड धाडले. तक्रारदारांना संरक्षण पुरवले. आता तर एसीबीने मोबाइल अ‍ॅपही सुरू केले.
विशेष म्हणजे बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यासोबत त्याच्या कुटुंबीयांविरोधातही एसीबीने गुन्हा नोंदविण्यास सुरुवात केली. त्यामुळे अधिकाऱ्याची पत्नी, मुले, जावई किंवा अन्य नातेवाईक साऱ्यांवरच गंडांतर आले. सापळ्यात रंगेहाथ अटक झालेल्यांचे फोटो एसीबीने आपल्या वेबसाइटवरून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यामुळे राज्यभर संबंधित लाचखोर अधिकाऱ्याची चर्चा होऊ लागली. त्यातून या अधिकाऱ्याने आधीच्या ठिकाणी केलेल्या घोटाळ्यांची प्रकरणे एसीबीपर्यंत येऊ लागली. या उपाययोजनांमुळे हळूहळू एसीबीवर जनतेचा विश्वास बसू लागला.
मुळात सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात एसीबी यशस्वी झाली. त्यामुळेच तक्रारींचे प्रमाण वाढले. परिणामी, कारवायाही वाढल्या, असे दीक्षित सांगतात.
२०१४मध्ये एसीबीने दुपटीहून अधिक सापळे रचले. त्यावरून एसीबीची आक्रमकता लक्षात येते. या वर्षी एसीबीच्या कारवायांचा वेग आणखी वाढला. पहिल्या दोन महिन्यांची तुलना केल्यास यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३६ कारवाया जास्त झाल्या आहेत. जनता जागृत झाल्याने तक्रारी वाढत आहेत. हे चित्र येत्या काळात असेच राहिले तर चिरीमिरीसाठी सर्वसामान्यांची कामे भिजत ठेवणाऱ्या राज्यातील तमाम लाचखोर व भ्रष्ट शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागेल.

एसीबीने १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत २१७ सापळे रचले. त्यात २८४ आरोपींना अटक केली. अटक आरोपींमध्ये ३८ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. तर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी सुमारे १४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला.

नेहमीप्रमाणे यंदाही लाचखोरीत गृह व महसूल विभागात चढाओढ आहे. अद्यापपर्यंतच्या चढाओढीत महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर आहे. महसूल विभागातूून या दोन महिन्यांत ६९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गृहविभागाचा नंबर असून, यामध्ये ४८ पोलिसांसह गृहविभागातील ६ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात रचलेले सापळे
(१ जानेवारी ते २ मार्च)
परिक्षेत्रसापळाअपसंपदा
नाशिक २७१
पुणे४३-
औरंगाबाद३५२
ठाणे३३३
नांदेड१९१
नागपूर३४१
अमरावती१८-
मुंबई१३१

शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअरही
च्लाच घेताना अटक झालेल्यांमध्ये १४ इंजिनीअर, ५ शिक्षक आणि ५ डॉक्टरांचा सहभाग आहे. त्यासोबत ४८ पोलीस, २७ तलाठी, २ वकील, २ नगरसेवक-महापौर, १ सरपंच, १ सभापती सहभागी आहेत. यात ३१ महिला अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहेत.

जयेश शिरसाट, मुंबई

Web Title: Bribery 'Bad Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.