नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठ्यांनी मागितली लाच
By Admin | Updated: March 14, 2015 22:11 IST2015-03-14T22:11:50+5:302015-03-14T22:11:50+5:30
अवकाळी पावसामुळे तालुक्यात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे काम शासकीय अधिकारी करत आहेत.

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठ्यांनी मागितली लाच
वाडा : अवकाळी पावसामुळे तालुक्यात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे काम शासकीय अधिकारी करत आहेत. मात्र बहुतांश अधिकारी आपल्या कार्यालयात बसुनच पंचनामे करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत.
नेहरोली येथील शेतकरी हरीभाऊ सोनावणे व नामदेव सोनावणे यांनी तलाठी सिमा सांबरे यांना आपल्या आंबा बागेची नुकसानी प्रत्यक्ष पाहण्याची विनंती केली असता सांबरे यांनी पंचनाम्यासाठी पाच हजार रू. ची लाच मागीतली असल्याची तक्रार संबंधीत शेतकऱ्यांनी वाडा तहसिल यांच्याकडे केली आहे.
सोनावणी यांच्या जागेत २३० आंब्याची झाडे असून अवकाळी पावसामुळे सर्व आंब्याचा मोहोर गळून गेला आहे. या आंब्यासाठी आठ लाख पन्नास हजाराचे बँक कर्ज घेतले असून पिकाच्या नुकसानीमुळे आमच्यावर प्रचंड आर्थिक संकट कोसळल्याचे या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
नुकसानीसंदर्भात तलाठी सांबरे यांना सांगितले असता मी शेतावर येऊन पंचनामा करणार नाही कार्यालयातच बसून पंचनामा करीन पण त्यासाठी त्यांनी पैशाची मागणी करून उद्धट भाषा वापरूनआमची मानसीक छळवणूक चालवली असल्याचे शेतकरी नामदेव सोनावणे यांनी सांगितले.
(वार्ताहर)
मी पंचनाम्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याकडून पैसे मागीतले नसून शेतकऱ्यांचा ७/१२ पाहून ज्या खातेदारांची नावे सातबाऱ्यावर आहेत त्या सर्व खातेदारांचे खाते क्रमांक मागीतले मात्र संबंधीत शेतकऱ्यांनी सर्व पैसे एकाच खात्यावर जमा करण्याची मागणी केली व मी शासन नियमानुसार या गोष्टीस नकार दिला.
-सीमा सांबरे,
तलाठी, जामघर सजा