Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2025 20:28 IST2025-11-20T20:28:14+5:302025-11-20T20:28:53+5:30
India-Israel Friendship: भारत- इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात, दोन देशांमध्ये मुक्त व्यापार कराराच्या अटी शर्तींना मिळाले अंतिम स्वरूप

Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल अविव : भारत आणि इस्रायल दोन देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मुक्त व्यापार कराराच्या अटी शर्तींना दोन देशांच्या व्यापार शिखर परिषदेमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले. दोन देशाच्या मैत्रीचे बीज तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लावले होते. त्याला पंख लावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाल्याचा उल्लेख केंद्रीय वाणिज्य व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी 'लोकमत'शी बोलताना केला. या करारामुळे दोन देशात अनेक प्रकारचे व्यापार मुक्तपणे होतील.
इस्रायल ४.५० लाख कोटींचा मेट्रो प्रोजेक्ट करत आहे. भारताने २३ राज्यात मेट्रो यशस्वीपणे अमलात आणली आहे. महाराष्ट्राने यात मोठे काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने इस्रायल मध्ये होणाऱ्या मेट्रोच्या कामाची निविदा भरावी, अशी सूचनाही आपण महाराष्ट्र सरकारला केल्याची घोषणा, मंत्री गोयल यांनी यावेळी केली.
भारत १९४७ ला तर इस्रायल १९४८ रोजी स्वतंत्र झाला. दोन्ही देशांच्या सीमेवरील राष्ट्रांमध्ये असंतोष आहे. दोन्ही देशांना अतिरेक्यांचा सामना करावा लागला. दोन्ही देशांचा संपन्न इतिहास आहे. या दोन्ही देशांनी अनेक संकट झेलली आहेत. दोघांचे इतिहास आणि सध्याची आव्हाने सारखी आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये होत असणाऱ्या या मुक्त व्यापार करारामुळे केवळ मैत्रीचे नवे पर्व सुरू होणार नाही, तर दोन देशातील व्यापारही वाढेल.
टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, डिफेन्स, स्पेस, फिनटेक, ॲग्री टेक, ए आय, सायबर सिक्युरिटी यामध्ये दोन देशांची देवाण-घेवाण होईल. भारतातून आंबे, द्राक्ष, केळी, दूध, औषधे पाठवण्याच्या मान्यता फास्ट ट्रॅकवर केल्या जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. मासेमारी करणाऱ्यांसाठी या मुक्त व्यापार कराराचा फायदा होईल.
इस्रायल मध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यासाठी भारतातून डॉक्टर, नर्सेस, इंजिनियर असे कुशल मनुष्यबळ देण्यासाठी दोन देशांमध्ये पूल उभारला जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे नोकऱ्या मिळू शकतील. याचा फायदा सर्व्हिस सेक्टरला मोठ्या प्रमाणावर होईल.
दोन्ही देशांमध्ये आयटी सर्विसेस आणि पर्यटनाला गती देण्यासाठीचे सगळे अडथळे दूर करण्यावर सहमती. याचा फायदा भारतातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना या देशात नोकऱ्या मिळण्यासाठी होईल. दोन्ही देशांमध्ये स्टार्टअप संबंधी संशोधन आणि विकास (R & D) यासंबंधी देवाण-घेवाण होईल. त्याचा दोन्ही देशातील लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. दोन देशांमध्ये सध्या थेट विमानसेवा नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दिल्ली तेल अविव आणि दुसऱ्या टप्प्यात मुंबई ते तेल अविव थेट विमानसेवा सुरू होणार.
भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांचे विश्वासू पार्टनर आहेत दोघांमध्ये अंतर विरोध नाही याचा फायदा दोन देशातल्या व्यवहारांना आणि सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक देवाण-घेवाणीसाठी होईल.
- पियुष गोयल, केंद्रीय मंत्री
'फ्री ट्रेड एग्रीमेंट' वर (मुक्त व्यापार करार) यावर भारताकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल तर इस्रायलकडून केंद्रीय मंत्री निर बरकत यांनी गुरुवारी रात्री स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांनी कराराच्या अटी शर्ती मान्य केल्या आहेत. भारताकडून यासाठी चीफ निगोशिएटर म्हणून प्रिया नायर यांनी काम पाहिले. या कराराला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत अंतिम स्वरूप देण्यात येईल असे यावेळी मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.