एलईडी दिव्यांवरून युतीत कलह
By Admin | Updated: March 8, 2015 02:29 IST2015-03-08T02:29:47+5:302015-03-08T02:29:47+5:30
पिवळे एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय पालिकास्तरावर व्हावा, अशी अट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी टाकली आहे़ त्यामुळे एलईडी दिव्यांचा वाद नव्याने रंगण्याची चिन्हे आहेत़

एलईडी दिव्यांवरून युतीत कलह
सत्तांतर्गत धुसफूस : भाजपाचा ओढा केंद्राकडे तर सेनेचा पालिकेसाठी आग्रह
मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील प्रयोगाच्या निष्कर्षानंतर मुंबईत एलईडी दिवे बसविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ मात्र हे काम केंद्र सरकारच्या कंपनीकडूनच होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत़ त्याच वेळी पिवळे एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय पालिकास्तरावर व्हावा, अशी अट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी टाकली आहे़ त्यामुळे एलईडी दिव्यांचा वाद नव्याने रंगण्याची चिन्हे आहेत़
मुंबईत एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय शिवसेनेला अंधारात ठेवून भाजपाने परस्पर घेतल्यामुळे उभय पक्षांमध्ये वाद पेटला आहे़ तरीही भाजपाने मरिन ड्राइव्ह येथे एलईडी दिव्यांचा प्रयोग केला़ मात्र यामुळे ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरिन ड्राइव्हची शोभा गेल्याची नाराजी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती़ यास भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे दोघांमध्ये सोशल मीडियावरुन वाद सुरू झाला होता़
हा वाद कायम असताना, ठाकरे यांनी रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शिवसेनेचा एलईडीला विरोध नाही, असे स्पष्ट केले़ मात्र पिवळे एलईडी दिवे लावायचे असल्यास पालिकेतूनच निर्णय व्हावा, अशी सूचना त्यांनी केली़ भाजपाने हे काम केंद्र पुरस्कृत कंपनीलाच देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे प्रशासनाला या कामासाठी पालिकेमार्फत निविदा मागविणे शक्य नाही़ मात्र एलईडीचे काम थेट केंद्राला देण्यावरून सेना-भाजपात वाद रंगत राहण्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)