माथेरान इकोझोनच्या संरक्षित झाडांची तोड
By Admin | Updated: December 29, 2014 22:46 IST2014-12-29T22:46:33+5:302014-12-29T22:46:33+5:30
माथेरानमध्ये इको झोनमधील संरक्षित वन असलेल्या नेरळ - लव्हाडवाडीमधील जंगलात विनापरवाना झाडे तोडण्यात आली आहेत. यात मोठ्या संख्येने दुर्मीळ झाडे तोडण्यात आली

माथेरान इकोझोनच्या संरक्षित झाडांची तोड
कर्जत : माथेरानमध्ये इको झोनमधील संरक्षित वन असलेल्या नेरळ - लव्हाडवाडीमधील जंगलात विनापरवाना झाडे तोडण्यात आली आहेत. यात मोठ्या संख्येने दुर्मीळ झाडे तोडण्यात आली असून या प्रकाराबाबत वन विभागाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. झाडे तोडून आठवडा लोटला तरी अद्याप वन विभागाने कोणावरही कारवाई केलेली नाही. दरम्यान, खैर जातीची झाडे तोडली जात असताना जंगलतोड करणाऱ्या ठेकेदाराला तोडलेली झाडे तेथून लंपास करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी मदत करीत असल्याचा आरोप स्थानिक लव्हाळवाडी ग्रामस्थ करीत आहेत.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमधील लव्हाळवाडी या आदिवासीवाडीच्या मागे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. माथेरान इकोझोनच्या संरक्षित वनाचा भाग असलेल्या या लव्हाळवाडीच्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे प्राणीगणतीत सिध्द झालेले आहे. अशा या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवान आणि खैर या जातीची झाडे आहेत. इको झोनचा भाग असल्याने येथील राखीव वन किंवा मालकी वनातील झाडे तोडण्यास कोणालाही परवानगी नाही. तशी परवानगी देण्याचे अधिकार वन विभागातील कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना नाही, मात्र अशा संरक्षित जंगलात झाडे तोडणे हे बेकायदा असल्याचे स्थानिक पातळीवर काम करणारे वन कर्मचारी हे जंगलतोड करणाऱ्या ठेकेदारांना मदत करीत असल्याचे उघड झाले आहे. तसाच प्रकार लव्हाळवाडीमधील संरक्षित वन असलेल्या जंगलात झाला आहे.
लव्हाळवाडी परिसरातील जंगलात मालकीची जमीन असलेले टपालवाडीमधील भिवा मालू पारधी यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या लव्हाळवाडी येथील काही पोटभागात मोठ्या प्रमाणात सागवान आणि खैर जातीची झाडे आहेत. ही झाडे भिवा पारधी यांच्या जावयाने तोडण्यासाठी सराईत ठेकेदाराला ते काम दिले. मागील आठवडयात शनिवार आणि रविवार या सलग आलेल्या सुटीचा फायदा घेवून शंभरहून अधिक झाडे तोडली. त्यानंतर ठेकेदाराने त्यातील अनेक ओंडके ट्रकमध्ये भरून विक्र ीसाठी नेली, अशी माहिती लव्हाळवाडी ग्रामस्थ सांगत आहेत.
वनविभागाने याबाबतची पाहणी केल्यावर तेथे त्यांना फक्त तोडलेल्या झाडांचे जमिनीलगत असलेले बुंधे आणि तोडलेल्या झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या आहेत. वन विभागाने त्यानंतर अजूनपर्यंत जावून पंंचनामा केलेला नाही. या भागातील संरक्षित वनाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या वनरक्षक माधवी बढे यांनी आपल्याला लव्हाळवाडीमध्ये खैर वृक्षाची झाडे तोडली आहेत याची माहिती नसल्याचे यावेळी सांगितले, त्यामुळे सगळ्या प्रकाराबाबतच संभ्रम निर्माण होत आहे. (वार्ताहर)
च्वन विभागाने अद्याप संबंधित जंगलतोड प्रकरणी पंचनामा केला नसल्याने जंगलतोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
च्दुसरीकडे नेरळ - माथेरान विभागाचे वनक्षेत्रपाल सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, जंगलातील वृक्षतोडीबद्दल गुन्हे नोंद करण्याचे काम सुरु असल्याने त्यांनी सांगितले.
च्मात्र याप्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.