खालापुरात वृक्षांची तोड
By Admin | Updated: May 4, 2015 23:48 IST2015-05-04T23:48:48+5:302015-05-04T23:48:48+5:30
तालुक्यातील खोपोली -पेण राज्यमार्गावर सुरू असलेल्या विद्युत वाहक तारा टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बेसुमार वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या

खालापुरात वृक्षांची तोड
खालापूर : तालुक्यातील खोपोली -पेण राज्यमार्गावर सुरू असलेल्या विद्युत वाहक तारा टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बेसुमार वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. वृक्षतोड मुद्दा माध्यमांनी उचलून धरल्यानंतर वन, महसूल विभाग जागा झाला असून महसूल विभागाकडून चौकशीला सुरु वात झाली आहे. तर पंचायत समितीच्या बैठकीत वृक्षतोडीचा मुद्दा गाजणार आहे.
खालापूर तालुक्याच्या पोलीगामा या कंपनीच्या एक्स्प्रेस फिडर या वाहिनीसाठी कंपनीला महावितरणकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीकडून अजिवली ते तांबाटी येथे सब स्टेशनपर्यंत राज्य मार्गालगत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत विद्युत पोल उभारले आहेत. या पोलवरून विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना कंडक्टर टाकण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांना कंपनीकडून लक्ष्य करण्यात आले आहेत. यामध्ये चिंच, पिंपळ,वड,उंबर आदि वृक्षांच्या फांद्या बेसुमार छाटण्यात आल्या असल्याने त्यासाठी संबंधित कंपनीने वन आणि महसूल विभागाची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. या कंपनीच्या कृत्याबाबत पर्यावरणप्रेमींनी तहसीलदार आणि वनक्षेत्रपाल यांचेकडे तक्र ार दाखल केली आहे .
वन विभागाकडून याबाबत पाहणी करण्यात आल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले असताना तहसीलदार यांनी याची दखल घेतली आहे. छाटलेल्या वृक्षांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले. कंपनीवर कारवाई करून वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे . (वार्ताहर)