'शिवाजी मंदिर'वरील बहिष्कार कायम राहणार! दुसऱ्या तिमाहीतही तिढा कायम

By संजय घावरे | Published: March 13, 2024 05:46 PM2024-03-13T17:46:14+5:302024-03-13T17:47:03+5:30

५०० रुपये तिकिट केल्यास दीडपट भाडेवाढी विरोधातील वाद.  

boycott on shivaji mandir natyagruh dadar will continue even in the second quarter the tension continued in mumbai | 'शिवाजी मंदिर'वरील बहिष्कार कायम राहणार! दुसऱ्या तिमाहीतही तिढा कायम

'शिवाजी मंदिर'वरील बहिष्कार कायम राहणार! दुसऱ्या तिमाहीतही तिढा कायम

संजय घावरे, मुंबई : दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. भाडेवाडीच्या मुद्द्यावरून काही नाट्य निर्मात्यांनी शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग न करण्याचा या वर्षातील पहिल्या तिमाहीत घेतलेला निर्णय दुसऱ्या तिमाहीत कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नसल्याने तूर्तास तरी हा तिढा कायम राहणार असल्याचे दिसते.

५०० रुपये तिकिट केल्यास नाट्यगृहाचे भाडे दीडपट घेण्याच्या श्री शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टच्या निर्णयासोबतच इतरही काही तक्रारींमुळे मराठी नाट्यसृष्टीतील आठ निर्मात्यांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये नाटक न करण्याचा घेतलेला निर्णय अद्यापही कायम आहे. या वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारीपासून मार्चपर्यंत संस्थांचे प्रयोग वगळता या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे शिवाजी मंदिरमध्ये आपल्या नाटकाचा प्रयोग केलेला नाही. यावर नाराज निर्मात्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे ट्रस्टने १० जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते, पण तोडगा निघणे दूरच चर्चाही झाली नाही. त्यानंतर 'लोकमत'शी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनंतर म्हणजेच १९ फेब्रुवारीनंतर निर्मात्यांना चर्चेसाठी बोलावणार असल्याचे सांगण्यात आले. त्यालाही महिना होत आला तरी निर्माते आणि ट्रस्ट यांच्यात कोणतीही अधिकृत बोलणी झालेली नाहीत. या वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील तारखांचे वाटपातही नाराज निर्मात्यांनी रुची दाखवलेली नसल्याने हा तिढा आणखी किती दिवस कायम राहणार? असा प्रश्न रंगकर्मी आणि प्रेक्षकांना पडला आहे. 

यावर श्री शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, निर्मात्यांनी कशासाठी बहिष्कार टाकला? त्यांची नेमकी काय तक्रार आहे? हेच समजत नाही. या संदर्भात ज्या निर्मात्यांना बोलणी करायची आहे त्यांनी यावे असे सांगितले होते, पण कोणीही आले नाही. काही नाटकांचे प्रयोग होत नसले तरी शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम नियमितपणे सुरू असून, नाट्यगृहाचे वेळापत्रक हाऊसफुल आहे.- दिलीप जाधव (नाट्य निर्माते, अष्टविनायक)

श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रयोग न करण्याचा निर्णय या पुढेही कायम राहील. चर्चेसाठी बोलावून तोडगा काढायचे सोडा, पण मंडळाच्या वतीने कोणी संपर्कही साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे पुढल्या तिमाहीतील तारखा वाटपात सहभागी होण्याचा प्रश्नच नाही. शिवाजी मंदिर वगळता महाराष्ट्रासह विदेशांमध्येही आमच्या नाटकांचे प्रयोग यशस्वीपणे सुरू आहेत.

Web Title: boycott on shivaji mandir natyagruh dadar will continue even in the second quarter the tension continued in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.