Join us  

दादर, ठाणे, कल्याण, गोराईत मतदानावर बहिष्कार; जनतेत नाराजीचा सूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:14 AM

आमची कामे हाेणार नसतील तर आम्ही मतदान तरी का करायचे? सर्वत्र संतप्त भावना.

मुंबई : दादर शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीमुळे उडणाऱ्या धुळीच्या मुद्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस पाठवून मैदानातून १५ दिवसांत माती काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १३ एप्रिलपासून माती काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, कामाच्या संथगतीमुळे माती काढा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा पवित्रा शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने घेतला आहे. दादर पश्चिमेला ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात खेळ खेळण्यासाठी मुले येतात. येथे टाकलेल्या लाल मातीमुळे धूळ उडत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. कित्येक वर्षांत यावर ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे रहिवासी संघटनेने एप्रिलमध्ये प्रदूषण मंडळाला पत्र पाठवले. मंडळाने १५ दिवसांत मैदानातील माती काढण्याचे निर्देश दिले. पण माती काढण्यास दोन-तीन महिने लागतील. म्हणून मतदानावर बहिष्कार टाकत आहाेत.

शिवाजी पार्कचे रहिवासी रस्त्यावर:

पालिकेच्या दिरंगाईमुळे आम्ही आमच्या हक्कापासून वंचित राहणार असल्यास आम्ही लोकप्रतिनिधी निवडून का देऊ? संथगतीने काम सुरू असल्याने त्याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. - प्रकाश बेलवडे, शिवाजी पार्क रहिवासी संघटना

‘नो वॉटर, नो व्होट’ गोराईकरांचा नारा:

मुंबई : बोरिवली खाडीपलीकडे असलेल्या गोराई गावात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील तीन हजारांहून अधिक कुटुंबांना भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ते जादा दराने टँकरचे पाणी विकत घेत आहेत. तर, काही कुटुंब गावातील विहिरीतील अशुद्ध पाणी आणत आहेत. त्यामुळे गोराईकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत ‘नो वॉटर, नो व्होट’चा नारा दिला आहे.

धारावी बेट बचाव समितीच्या लुर्डस डिसोझा ‘लोकमत’ला म्हणाले, कोळीवाडा, भंडारवाडा, जुईपाडा आदी भागाला पिण्याचे पाणीच येत नाही. गोराई-उत्तन रोडवर पाईपलाईन आहे. मात्र, पाण्याचा दाब नाही. वैराळा तलाव, शेपळी, हलावर, आदिवासी पाडे येथे अद्याप एक थेंबही पाणी आलेले नाही. या वॉर्डातील जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल केला. परंतु, पुढे ठोस काही झालेले नाही.

गोराईतील ज्या भागात जलवाहिनी टाकणे शक्य नाही, तेथे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करते. गोराई गावात सक्शन टँकचे काम सहा-सात महिन्यांत पूर्ण होईल. मनोरीतून जलवाहिनीद्वारे पाणी त्यात साठवल्यावर येथील पाणी समस्या दूर होईल.- संध्या नांदेडकर, साहाय्यक आयुक्त, आर मध्य

ठाण्यात गटारगंगा, मतदान का करावे?

ठाणे : घोडबंदर गावातील रस्ता सध्या एखाद्या जलतरण तालावासारखा झाला आहे. रस्त्याला गटारगंगेचे स्वरुप आल्याने बुधवारी रहिवासी रस्त्यावर उतरले. ही गटारगंगा तत्काळ बंद केली नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार  रहिवाशांनी केला आहे. 

ठाणे पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका वाघबीळ गावातील रहिवाशांना बसत आहे. जवळजवळ १० वर्षांपासून रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. यातून ये-जा करताना रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असतानाही वाघबीळ गाव भकास आहे. यासंदर्भात रहिवाशांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु पालिकेने कोणतीच पावले उचलली नाहीत, असा  रहिवाशांनी आरोप केला आहे. पावसाळ्यात आणखी हाल सोसावे लागतील, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

उमेदवाराला येऊ देणार नाही-

येथील रहिवाशांनी याच गटारगंगेत माशांना गळ टाकतात त्या पद्धतीने गळ टाकून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. एकाही उमेदवाराला प्रचाराला येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

वालधुनी पात्रातील काम कधी थांबणार?

कल्याण : विठ्ठलवाडी स्टेशन समोरच कल्याण-डोंबिवली पालिका बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत आहे. त्याचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. 

त्याच्याकडून वालधुनी नदीपात्रात भराव टाकला जात आहे. त्याठिकाणी भली मोठी भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या नागरिकांना पावसाळ्यात पुराचा धोका आहे. त्यामुळे हे काम बंद करा नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू, असे नागरिकांनी सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अहवाल मागविण्यात येईल, असे म्हटले होते. दरवर्षी जास्त पाऊस झाल्यावर नदी पात्राजवळ असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचते, सुरेखा जगताप  म्हणाल्या. मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे ठोस तोडगा निघाला नाही. वनिता पावशे म्हणाल्या, पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका बसतो. याकडे कानाडोळा करीत पालिकेने बांधकामाची परवानगी कशाच्या आधारे दिली? 

ठोस तोडगा निघायला हवा-

कल्याण विकासिनीचे प्रमुख उदय रसाळ आणि माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांनी नागरिकांची बाजू उचलून धरली आहे. नागरिकांचे समाधान होत नसल्यास पालिका आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर ठोस तोडगा काढला पाहिजे. 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान