Join us  

मुलगा झाला की मुलगी, वाद पोलिस ठाण्यात; डीएनए चाचणीनंतर होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 1:01 PM

केईएम रुग्णालयात २० सप्टेंबर रोजी एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला मुलगा झाल्याची वर्दी दिली. मात्र, काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी मुलगा नव्हे, मुलगी झाल्याचे सांगितले.

मुंबई : प्रसूतीनंतर नवजात अर्भक मुलगा आहे की मुलगी, हे लगेचच मातेला सांगितले जाते. मात्र, आधी मुलगा झाला, असे सांगून नंतर ‘नाही हो मुलगी झाली’, असे सांगितले गेले, तर मातेचा गोंधळ होणारच. असाच प्रकार घडला आहे केईएम रुग्णालयात. 

केईएम रुग्णालयात २० सप्टेंबर रोजी एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला मुलगा झाल्याची वर्दी दिली. मात्र, काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी मुलगा नव्हे, मुलगी झाल्याचे सांगितले. त्यामुळे महिला गोंधळली. ही बाब तिने नातेवाइकांना सांगितली. परिचारिका काही तरी घोळ घालत असल्याचे महिला म्हणाली. त्यानंतर नातेवाइकांनी थेट भोईवाडा पोलिसांत धाव घेतली.

नवजात अर्भक आणि आई-वडील यांची डीएनए चाचणी करण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी कलिना येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी तिघांचेही रक्तनमुने घेतले. काही दिवसांतच या अहवालाचा निकाल येणार असल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी असे सांगितले.  

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे डीएनए चाचणीसाठी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार केईएम रुग्णालयातून नवजात अर्भक, माता आणि बाळाचे वडील या तिघांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. - सुभाष बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोईवाडा पोलिस ठाणे 

टॅग्स :हॉस्पिटलपोलीस ठाणेपोलिस