सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यासाठी चढाओढ
By Admin | Updated: March 31, 2015 02:15 IST2015-03-31T02:15:22+5:302015-03-31T02:15:22+5:30
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विविध घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नांचा भडिमार सुरू आहे.

सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यासाठी चढाओढ
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विविध घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नांचा भडिमार सुरू आहे. विशेषत: सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रमुख पक्षांत चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले आहे.
यावेळची निवडणूक रंजक होणार आहे. मागील वीस वर्षांपासून महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. ती टिकवण्याचे आव्हान माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासमोर आहे. त्या दृष्टीने त्यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या सत्ताकेंद्राला सुरुंग लावून महापालिकेवर भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना आतूर झाली आहे. विधानसभा निवडणुकीत बेलापूरमधील यशानंतर भाजपाचे चांगलेच मनोबल वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून समाजातील विविध घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. विशेषत: विविध सामाजिक संघटना व महिला मंडळांना आपल्याकडे खेचण्याची जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या आगामी सभागृहात महिला सदस्यांचा बोलबाला असणार आहे. कारण यावेळी प्रथमच महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १११ प्रभागापैकी ५६ सदस्य या महिला असणार आहे. त्यामुळे सामाजिक संघटना व महिला मंडळांचा पाठिंबा उपयुक्त ठरणार आहे. शहरात सामाजिक संघटना आणि महिला मंडळांची संख्या पावणे दोनशेच्या घरात आहे.
यापैकी अनेक संस्थांचा सामाजिक क्षेत्रात चांगला प्रभाव आहे. विविध समाजोपयोगी कामाच्या माध्यमातून या संस्थांनी स्थानिक पातळीवर मतदारांशी उत्तम नेटवर्क प्रस्थापित केले आहे. त्याचा फायदा घेण्याची योजना राजकीय पक्षांनी आखली आहे. याचाच परिणाम म्हणून अशा विविध संस्थांना आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पाहावयास मिळते.
त्यासाठी या संस्थांना विविध प्रकारची आमिषे दाखविली जात आहेत. संस्थांच्या कार्यालयासाठी जागा, आर्थिक मदत, पदाधिकाऱ्यांची महापालिकेच्या विषय समितीवर वर्णी, सदस्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य, रोजगार, त्यांच्या कार्यालयास फर्निचर, दूरदर्शन संच, वॉटर कुलर आदी प्रकारच्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे.