Join us

फेरीवाल्यांना धाक बाउन्सर्सचा; महापालिका अपयशी ठरल्यामुळे कांदिवलीच्या सोसायटीने लढविली नामी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:37 IST

कोरोना साथीच्या काळापासून या सोसायटीच्या परिसरातील पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले होते. त्यामुळे रहिवाशांना चालण्यासही जागा शिल्लक नव्हती.

मुंबई : वारंवार तक्रारी-आर्जवे करूनही बेकायदा फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात मुंबई महापालिकेला अपयश येत असल्याचे वारंवार सिद्ध होत आले आहे. रस्ते, फूटपाथ, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा किंवा अगदी सोसायट्यांचे गेटही अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर महापालिका कायमस्वरूपी कारवाई करण्यात कुचकामी ठरल्याने जागरूक नागरिक फेरीवाल्यांचा चोख बंदोबस्त कसा करतात, याचे एक मासलेवाईक उदाहरण सर्वत्र चर्चेत आहे. चिलटांप्रमाणे चिकटून बसलेल्या फेरीवाल्यांना जरब बसवून परिसराचा श्वास मोकळा करणारी ही सोसायटी आहे कांदिवलीची.

कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगरमधील पंचशील हाइट्स या सोसायटीने फेरीवाल्यांना वचक बसवण्यासाठी चक्क बाउन्सर्स नेमले आहेत. कोरोना साथीच्या काळापासून या सोसायटीच्या परिसरातील पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले होते. त्यामुळे रहिवाशांना चालण्यासही जागा शिल्लक नव्हती.

मार्ग नव्हता म्हणून पर्याय शोधला...फेरीवाल्यांविरोधात पालिकेकडे तक्रार करण्यात आली. पण प्रत्येकवेळी पालिकेची गाडी आली की फेरीवाले गायब होत आणि १५ ते २० मिनिटांनी ते पुन्हा प्रकट होत असत. त्यांच्यामुळे सोसायटीसमोरचा पदपथही बंद झाला होता. आम्ही बाउन्सर्सची मदत घेतली, असे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संगितले. गेल्या १५ दिवसांपासून तेथे बाउन्सर्स तैनात आहेत. फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका अपयशी ठरल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी मनीष साळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भागात आम्ही सातत्याने फेरिवाल्यांवर कारवाई करत असतो, असे सांगितले.

सदस्यांवर आर्थिक भारया सोसायटीच्या तीन विंग आणि ३०० सदनिका आहेत. एक हजार रहिवासी तेथे राहतात. फेरीवाल्यांच्या बंदोबस्तासाठी १२ बाउन्सर नेमले आहेत. त्यात काही महिला बाउन्सरही आहेत. बाउन्सर पुरवणाऱ्या एजन्सीला दर दिवसाला दहा हजार रुपये दिले जातात. त्यामुळे सोसायटी सदस्यांवर आर्थिक भार पडत आहे. मात्र पालिका डोळेझाक करत असल्याने अन्य पर्याय नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बाउन्सर सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत पदपथावर बंदोबस्त देत आहेत.

पालिकेमुळे नवी डोकेदुखीमहापालिकेने सोसायटी समोरील रस्त्यावर पे-अँड पार्क सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे. आता नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे सोसायटीने मध्यंतरी स्थानिक आमदार योगेश सागर यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी लक्ष घालून पालिकेला सूचना केली होती. काहीकाळासाठी फेरीवाले गायब झाले, मात्र ते पुन्हा येऊ लागले, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई