दोघींचे अपहरण करून दागिन्यांची लूट
By Admin | Updated: July 7, 2015 02:28 IST2015-07-07T02:28:51+5:302015-07-07T02:28:51+5:30
सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असतानाच वाहनात बसलेल्या दोन महिलांचे अपहरण करून त्यांच्याकडील २५ हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी रात्री ११च्या सुमारास डोंबिवली पश्चिमेत घडली.

दोघींचे अपहरण करून दागिन्यांची लूट
डोंबिवली : सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असतानाच वाहनात बसलेल्या दोन महिलांचे अपहरण करून त्यांच्याकडील २५ हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी रात्री ११च्या सुमारास डोंबिवली पश्चिमेत घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
देवीचापाडा परिसरात राहणारे मितेश पटेल हे आपल्या कुटुंबासमवेत रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्सल जेवण घेण्यासाठी गेले होते. पत्नी, आई आणि दोन मुलांना गाडीतच बसायला सांगून ते हॉटेलच्या काउंटरवर जेवणाची आॅर्डर देण्यासाठी गेले. त्या वेळी २३ ते २५ वयोगटांतील दोन अनोळखी तरुणांनी गाडीत बसलेल्या व्यक्तींसह ती ठाकुर्ली फाटकाच्या दिशेने पळविली. या वेळी मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या हरेश चव्हाण या तरुणाला त्यांनी गाडीची ठोकर मारल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली.
दरम्यान, रेल्वेचे फाटक बंद असल्याने त्यांनी गाडी बावनचाळ परिसरात थांबवून दोन महिलांकडील दागिने आणि मोबाइल घेऊन पोबारा केला. अपहरण आणि लुटमारीच्या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. पादचारी महिलांना लुटण्याच्या घटना घडत असताना गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलाही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. (प्रतिनिधी)