Join us  

'मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत आणि...', क्रांती रेडकरने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 4:18 PM

'समीरने 2016 मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि 2017 मध्ये आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं.'

मुंबई: मुंबई क्रुझ पार्टी प्रकरणाची चौकशी करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर दोन विवाह करणे आणि नोकरीसाठी धर्म बदलणे यासारख्या गंभीर आरोप होत आहेत. समीर वानखेडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे, पण आता त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनेही ट्विटवर सत्य सांगितलं आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर दलित नव्हे तर मुस्लिम असल्याचा आरोप केला. तसेच, समीरने दोन लग्न केल्याचंही सांगितलं आहे. याबाबत मलिक यांनी काही डॉक्युमेंट्सही शेअर केले आहेत. पण, आता समीर यांची पत्नी क्रांती रेडकरने या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

ट्विटरवर क्रांतीने सांगितलं की, ''मी आणि समीर दोघेही जन्मतः हिंदू आहोत आणि दोघांचेही हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न झाले आहे. आम्ही इतर कोणत्याही धर्मामध्ये कधीच धर्मांतर केलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहेत आणि माझ्या त्यांनी माझ्या मुस्लीम सासूशी लग्न केलं होतं. समीरने 2016 मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता आणि 2017 मध्ये आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे.''

नवाब मलिक यांचा आरोप

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून समीर वानखेडे यांना सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. त्यावर 'पेहचान कौन?' असा सवाल केला आहे. तर दुसऱ्या एका ट्विटरमध्ये काही कागदपत्रंही ट्विट करुन 'यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा', असंही मलिक यांनी म्हटलं आहे. यात त्यांनी वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे या संपूर्ण नावाचा उल्लेख केला आहे. याशिवाय, बनावट जात प्रमाणपत्र बनवून समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

कोण आहेत समीर वानखेडे?महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले होते. समीर वानखेडे हे अमली पदार्थां संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

 

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकक्रांती रेडकरनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो