कर्जतचे दोघे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
By Admin | Updated: September 24, 2014 23:27 IST2014-09-24T23:27:10+5:302014-09-24T23:27:10+5:30
कर्जत तालुक्यातील गणेगाव - चिंचवली येथे काही वर्षापूर्वी प्रगती लॅन्ड अँड हौसिंग कार्पोरेशन मुंबई हा प्रोजेक्ट सुरु झाला होता.

कर्जतचे दोघे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
कर्जत : कर्जत तालुक्यातील गणेगाव - चिंचवली येथे काही वर्षापूर्वी प्रगती लॅन्ड अँड हौसिंग कार्पोरेशन मुंबई हा प्रोजेक्ट सुरु झाला होता. या प्रोजेक्टची मोठ्या प्रमाणात जाहिरात सुध्दा करण्यात आली होती. या प्रोजेक्टची जाहिरात बघून अनेकांनी याठिकाणी पैसे गुंतवले होते. मात्र प्रोजेक्ट पूर्ण न झाल्याने अनेकांचे पैसे अडकले आहेत. या प्रोजेक्टमधील कर्जत तालुक्यातील दोघांना दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
गेल्या पाच-सात वर्षांपासून कर्जत तालुक्यात दिल्लीतील काही पार्टींनी कंपन्यांची स्थापना करून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी सुरू केली. कंपन्याचे सदस्यपद त्या भागातील प्रतिष्ठित व्यक्तींना दिले. त्यामध्ये काही राजकीय व्यक्तीही आहेत.
मुंबईचा राहणारा अॅश्ले कॅशीसीओ याने कर्जत तालुक्यातील गणेगाव चिंचवली येथे काही वर्षापूर्वी प्रगती लॅन्ड अँड हौसिंग कार्पोरेश मुंबई हा प्रोजेक्ट सुरु केला होता. हा प्रोजेक्ट शासकीय आहे असे भासवून या प्रोजेक्टसाठी लोकांकडून मोठमोठ्या रकमा स्वीकारल्या व पैसे गोळा गेले. याबाबत दिल्ली येथे राहणारे अजित गुप्ता यांनी आपली फसवणूक झाली म्हणून दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये अॅश्ले कॅशीसीओ यांच्या विरुध्द २0१0 रोजी तक्रार दाखल केली. त्या प्रकारणात अॅश्ले कॅशीसीओ याला दिल्ली पोलिसांनी या आधीच ताब्यात घेतले आहे. मात्र या तपासात अॅश्ले कॅशीसीओ याने एक कंपनी स्थापन केली असून त्या कंपनीत कर्जत तालुक्यातील गणेगाव-चिंचवली येथे राहणारे मनोहर सीताराम पाटील व दत्तात्रेय मोहिते हे सदस्य आहेत, हे निप्षन्न झाले आहे. या कंपनीने काही कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी गिरीशचंद्र हे आपल्या फौजफाट्यासह १८ सप्टेंबर रोजी कर्जतमध्ये आले होते. त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याची मदत घेऊन मनोहर पाटील व दत्तात्रेय मोहिते यांना ताब्यात घेतले. तर अॅश्ले कॅशीसीओ याच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल आहेत.