Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी चलन लुटणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:06 IST

चोरीच्या मोबाइलचा वापर करत फॉरेन करन्सी एक्सचेंज कंपनीकडून विदेशी चलन मागवायचे आणि नंतर ते लुबाडून पळ काढणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला

मुंबई : चोरीच्या मोबाइलचा वापर करत फॉरेन करन्सी एक्सचेंज कंपनीकडून विदेशी चलन मागवायचे आणि नंतर ते लुबाडून पळ काढणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघांना अटक केली आहे. या टोळीने ही कार्यपद्धती वापरत अनेक कंपन्यांना चुना लावला असून त्यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत.जेठाराम उद्धाराम माली उर्फ जयेश (३२) आणि राजकुमार दुबे (३२) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यात दुबे हा कुर्ल्याचा तर माली हा सांताक्रूझचा राहणारा असून त्याच्यावर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील तक्रारदार प्रदीप मेंडसुरे (५६) हे गोरेगावमधील फॉरेन एक्सचेंज कंपनीत काम करतात. त्यांना १ फेब्रुवारीला हार्दिक नावाच्या एका व्यक्तीने फोन करत त्याला ४ हजार अमेरिकन आणि २ हजार सिंगापूर डॉलर हवे असल्याचे सांगत गोरेगावच्या मोहन गोखले रोड परिसरात बोलावून घेतले. मेंडसुरे संबंधित ठिकाणी पोहोचले तेव्हा एका कारमध्ये हार्दिक आणि त्याचे तीन साथीदार बसले होते. त्यांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी भासवत मेंडसुरे यांच्याकडील ३ लाख ९६ हजार रुपये किमतीचे विदेशी चलन घेऊन पसार झाले.या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास सुरू होता. विलेपार्लेच्या कृपानगर परिसरात हे आरोपी येणार असल्याची टीप डॉ. राठोड यांना मिळाली. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. विलेपार्ले, अंबोली आणि जुहूमध्येही त्यांच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. माली हा चोरीचे मोबाइल खरेदी करून त्यातील सिमकार्डचा वापर करत चलन एक्सचेंज कंपनीला फोन करायचा आणि चलन लुबाडून पसार व्हायचे अशी त्यांची कार्यपद्धती होती. मात्र दिंडोशी पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या.