मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला घसरलेला मुंबईचा किमान तापमानाचा पारा मुंबईकरांना आल्हादायक हवामानाचा अनुभव देत असून, गुरुवारी बोरीवली येथे १४.१३ तर पनवेल येथे १२.८५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १७.२ अंश नोंदविण्यात आले असून, बुधवारच्या तुलनेत यात २ अंशाची वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस होते. दरम्यान, राज्यात गुरुवारी सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूरमध्ये १०.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.मुंबईत बीकेसी, अंधेरी, मालाड, कांदिवली, चेंबूर, विद्याविहार, भांडुप, मुलुंड; तर नवी मुंबईत नेरूळ येथील किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील किमान तापमान कमी असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.महाराष्ट्रही थंडीने गारठला असतानाच शुक्रवारसह शनिवारी विदर्भासह मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ होईल आणि पुन्हा ५ जानेवारीनंतर येथील किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, समुद्र किनाऱ्यावरील शहरांच्या तापमानातही काही अंशी वाढ नोंदविण्यात येणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, गोव्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.विदर्भात ३ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ४ ते ६ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबईचा विचार करता शुक्रवारसह शनिवारी मुंबईचे आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.गुरुवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)चंद्रपूर १०.६नाशिक ११.६सातारा १२.२नागपूर १२.३पुणे १२.७महाबळेश्वर १३.२अकोला १४.२अमरावती १४.२यवतमाळ १४.४गोंदिया १४.६वाशिम १५वर्धा १५.४बुलडाणा १५.४औरंगाबाद १५.७मालेगाव १५.८बीड १५.९सांगली १६.६मुंबई १७.२कोल्हापूर १७.२परभणी १७.६दिवाळी व त्यानंतरही बराच काळ स्थिरावलेला पाऊस तसेच वातावरणातील बदल यामुळे मुंबईत यंदा थंडी थोडी उशिरानेच दाखल झाली. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत.
बोरीवली, पनवेल सर्वाधिक थंड; मुंबईच्या तापमानात घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 04:32 IST