मुंबई - गोव्यातील एका बंगल्याचे बुकिंग करत त्यासाठी २० हजार रुपये मोजणे उद्योजकाला महागात पडले आहे. या व्यक्तीने आपल्या कुटुंबासोबत नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यातील एका बंगल्याचे बुकिंग केले खरे; पण ज्यावेळी ही व्यक्ती गोव्याला पोहोचली तेव्हा त्या जागी तो बंगलाच नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या व्यक्तीने गोवा पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, आता याप्रकरणी मुंबई ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित उद्योजक हा चंदिगडचा रहिवासी आहे. त्याने ‘बुकिंग डॉट कॉम’ या वेबसाइटद्वारे गोव्यातील ‘रुबी व्हीला’ या जागेची निवड केली. याकरिता एमडी गोरेमिया नावाच्या व्यक्तीने या बंगल्याचे काम आपण पाहतो, असे सांगत या उद्योजकाशी संवाद सुरू केला. या व्यक्तीने आपल्याला २५ डिसेंबर ते ४ जानेवारीकरीता आपल्यासह १० लोकांसाठी बंगल्याचे बुकिंग हवे असे सांगितले. त्यानंतर या बुकिंगसाठी आगाऊ रक्कम म्हणून गोरेमिया याने त्याच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. गोरेमियाने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर या व्यक्तीने ती रक्कम ‘जी-पे’च्या माध्यमातून पाठवली. मात्र, प्रत्यक्ष गोव्याला गेल्यानंतर संबंधित जागेवर तो बंगलाच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली.