बेवारस बॅगेत सव्वा लाखाचा ऐवज
By Admin | Updated: May 11, 2015 02:09 IST2015-05-11T02:09:02+5:302015-05-11T02:09:02+5:30
खोपट एसटी स्थानकामध्ये मिळालेल्या बेवारस बॅगेत ११ हजारांच्या रोकडसह सव्वा लाखाचा ऐवज शुक्रवारी दुपारच्या सुमारास मिळाला.

बेवारस बॅगेत सव्वा लाखाचा ऐवज
ठाणे : येथील खोपट एसटी स्थानकामध्ये मिळालेल्या बेवारस बॅगेत ११ हजारांच्या रोकडसह सव्वा लाखाचा ऐवज शुक्रवारी दुपारच्या सुमारास मिळाला. सुरुवातीला या बॅगेत बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त होऊन घबराट पसरली होती. मात्र, बॉम्बशोधक — नाशक पथकाने तिची तपासणी करून तसे काही नसल्याचा निर्वाळा दिला. रात्री उशिरा ज्यांची बॅग होती, ते बाळू हजारे स्थानकात पोहोचले. त्यांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतर ती त्यांना सुपुर्द करण्यात आली.
दुपारी १२च्या सुमारास बेवारस बॅग खोपट स्थानकात असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. बॅगेत एखादा स्फोटक पदार्थ असल्याच्या शक्यतेने बॅगेपासून सर्व प्रवाशांना दूर करण्यात आले.
अर्ध्या तासात ठाणे शहर पोलिसांच्या बॉम्ब-शोधकनाशक (बीडीडीएस) पथकाने श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्निफर डॉग राणाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगेत स्फोटक पदार्थ नसल्याचा इशारा राणाने केल्यानंतर बॅग उघडण्यात आली. त्यात ११ हजारांची रोकड, मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी आणि सोनसाखळ्या आणि नवीन कपडे असा सव्वा लाखाचा ऐवज मिळाला. या घटनेमुळे काही काळ येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
बॅगेवर मालकाच्या नावाचा उल्लेखच नाही
च्मालकाच्या नावाचा काहीच उल्लेख बॅगेवर नव्हता. त्यामुळे ती आधी नौपाडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
च्दरम्यान, रात्री ९ वाजता बाळू हजारे बॅगेचा शोध घेत पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा भाजी विक्रेते असलेले आपले भाऊ गणेश हजारे (३८) यांची ती बॅग असून, सकाळी ८.३० वा.च्या सुमारास गावी लग्नासाठी जाताना ते स्थानकातच विसरल्याचे त्यांनी सांगितले. बॅग आणि आतील सामानाची त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना ती सुपुर्द केल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.