Bombay HC: हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल चित्रपट निर्मात्या फराह खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले. ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी दाखल करण्यात आली आहे का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने अशी प्रकरणे न्यायालयात आणता असं म्हटलं. बिग बॉस १३ चा स्पर्धक असलेल्या हिंदुस्तानी भाऊने निर्मात्या फराह खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. फराह खान यांनी होळी हा छपरी लोकांचा सण आहे असं म्हटलं , ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या , असा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला होता.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या हिंदुस्तानी भाऊला विचारले की फराह खान यांच्या टिप्पणीमुळे ते कसे दुखावले जाऊ शकतात. जर इतका आक्षेप होता, तर तुम्ही स्वतः एफआयआर दाखल का केला नाही? तुम्ही वकिलामार्फत तक्रार का पाठवली? असा सवालही न्यायालयाने विचारला. यावर हिंदुस्तानी भाऊची बाजू मांडणारे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी, ज्या चॅनेलवर हा शो प्रसारित झाला होता त्यांनी आमची तक्रार दाखल केल्यानंतर वादग्रस्त भाग काढून टाकला, असं म्हटलं.
"तुम्ही इतके का दुखावले आहात? इतके संवेदनशील होणे थांबवा. आमच्याकडे २०० हून अधिक प्रकरणे सूचीबद्ध आहेत आणि तुम्ही असे खटले न्यायालयात आणता... कशासाठी? प्रसिद्धीसाठी, तुमचे नाव मथळ्यात येण्यासाठी? असे खटले न्यायालयात का आणता? त्या 'छपरी' म्हणाल्या. पण 'तुम्ही' छपरी नाही तर एक सज्जन आहात, मग तुम्ही इतके दुखावले का आहात? चॅनेलने तो भाग काढून टाकला आहे. लोक आता ते विसरले आहेत, मग तुम्हाला हे का करायचे आहे? तुम्ही स्वतः तक्रार का केली नाही, तुम्ही आधी वकिलामार्फत तक्रार का पाठवली?" असं खंडपीठाने म्हटलं.
सुनावणीदरम्यान, खंडपीठाने हिंदुस्तानी भाऊच्या वकिलाला, तुमच्या अशिलाला नॅशनल जिओग्राफी, ट्रॅव्हल आणि लिव्हिंग चॅनेल पाहण्यास सांगा, त्यांना अशा चॅनेल पाहून आनंद होईल, असं म्हटलं. न्यायालयाने फटकारानंतर, हिंदुस्तानी भाऊने याचिका मागे घेतली आहे.