मुंबई : न्यायालयाच्या अनेक आदेशांना न जुमानता पत्नी आणि दोन मुलांना पोटगी देण्यास वारंवार नकार देणाऱ्या एका डॉक्टरला उच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या दिवाणी स्वरूपाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने डॉ. मनीष गणवीर यांना जाणूनबुजून अनेक निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने डॉक्टरांच्या वर्तनावर ताशेरे ओढले. पतीला कायद्याच्या राज्याचा आदर नाही. त्यांना या न्यायालयाच्या आदेशांची पर्वा नाही. याचिकाकर्त्याने केवळ न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले नाही; तर पत्नी आणि तीन मुलींना सांभाळण्यास जाणूनबुजून दुर्लक्षही केले, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली.
युक्तिवाद काय ?
बचावात याचिकादाराच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, देखभालीचा खर्च जास्त आहे. तितका खर्च देण्यास याचिकादार असमर्थ आहे. मात्र, न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला. पतीने न्यायालयाच्या निर्देशांचे वारंवार पालन न करणे हे न्यायालयाची 'उघडपणे अवज्ञे'चे कृत्य आहे. पतीला सहानुभूती न दाखवता न्यायालयाने त्याला दिवाणी स्वरूपाची सहा महिने कारावासाची ठोठावली. कायद्याचे असे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शिक्षेशिवाय सोडू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.