‘बॉम्बे’ला मुंबईकरांचाच मिळतोय ‘आधार’
By Admin | Updated: December 22, 2014 02:33 IST2014-12-22T02:33:32+5:302014-12-22T02:33:32+5:30
अपघातात अति रक्तस्त्राव किंवा शस्त्रक्रियेत रक्ताची गरज भासते

‘बॉम्बे’ला मुंबईकरांचाच मिळतोय ‘आधार’
पूजा दामले, मुंबई
अपघातात अति रक्तस्त्राव किंवा शस्त्रक्रियेत रक्ताची गरज भासते. अशावेळी सर्वसामान्य ८ रक्तगटांतील रक्त रक्तपेढीमधून उपलब्ध होऊ शकते. पण बॉम्बे ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना या रक्तगटाचे रक्त मिळणे फार कठीण असते. हा दुर्मीळ रक्तगट उपलब्ध व्हावा, यासाठी मुंबईकरांचा आधार मिळत आहे. हा रक्तगट असलेले मुंबईकर रक्तदानातून ही गरज पूर्ण करीत आहेत.
मुंबईतील थिंक फाउंडेशनतर्फे महिन्याला किमान दोनदा तरी ‘बॉम्बे’ ब्लड गु्रपचे रक्त हे मुंबईबाहेर पाठवले जाते. मुंबईत सुमारे ६० व्यक्तींचा रक्तगट हा ‘बॉम्बे’ ब्लड गु्रप हा आहे. या व्यक्तींना आम्ही आधीच सांगून ठेवले आहे, तुम्ही रक्तदान करू नका. जेव्हा आम्ही तुम्हाला संपर्क साधू तेव्हाच तुम्ही रक्तदान करा. ६० पैकी ३० व्यक्ती या रक्तदान करण्यासाठी फिट असतात. आम्ही त्यांना फोन केला की त्या तत्काळ येऊन रक्तदान करतात. काही वेळा पुणे, नाशिक येथील व्यक्ती मुंबईत येऊन रक्तदान करतात, असे थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले. कुटुंबामध्ये एका व्यक्तीचा रक्तगट बॉम्बे आढळल्यास आम्ही त्यांच्या कुटुंबीयांनाही तपासण्या करून घ्यायला सांगतो. या रक्तगटाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असे विनय यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील काही ठिकाणी बॉम्बे रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती सक्रिय आहेत. पण काही वेळा त्यांच्याकडे रक्तदाता असला तरी रक्त पाठवण्यासाठी लागणारी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना रक्त पाठवण्यात अडचणी येतात. यामुळे त्या व्यक्ती जिल्हा, शहर पातळीवर रक्तपुरवठ्याचे काम करतात.
प्रत्येक महिन्यात एकदा तरी महाराष्ट्राबाहेर रक्त पाठवले जाते. गेल्याच महिन्यात मुंबईतून झारखंड, नागपूर, रांची आणि दिल्लीमध्ये काही युनिट रक्त पाठवण्यात आले होते. हे रक्त पाठवण्यासाठी मुंबईत एक सिस्टीम तयार झाली आहे. यामुळे मुंबईतून रक्त पाठवणे आम्हाला अधिक सोपे जाते. ‘बॉम्बे’ ब्लड ग्रुप म्हणजे काय?
सर्वसाधारण आठ रक्तगटांमध्ये ए, बी आणि एच अॅँटिजेन असते. पण बॉम्बे ब्लड गु्रप असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तात एच अँटिजेन नसते. यामुळे या व्यक्तींना इतर ८ रक्तगटांपैकी कोणत्याही रक्तगटाचे रक्त दिल्यास त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. अनेकदा बॉम्बे ब्लड गु्रप असणाऱ्या व्यक्तींचा रक्तगट ओ असल्याचे सांगितले जाते. पण अजून तपासण्या केल्यावर त्यांचा रक्तगट बॉम्बे असल्याचे निदान होते.