Join us  

सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांच्या अंगावर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 12:25 PM

मुंबईत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांवेळीचा एक अंगावर काटा आणणार प्रसंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे.

मुंबई

मुंबईत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांवेळीचा एक अंगावर काटा आणणार प्रसंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे. ज्यावेळी शिवसेना भवनाबाहेर स्फोट झाला होता. तेव्हा तिथंच असलेल्या बँकेत शर्मिला आणि राज यांची बहिण जयवंती ठाकरे काम करत होत्या. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते शर्मिला ठाकरे यांनी सविस्तर सांगितलं. राज आणि शर्मिला ठाकरे यांनी एबीपी माझा आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यावेळी दोघांनी अनेक आठवणी शेअर केल्या. त्यात १९९३ सालच्या बॉम्बस्फोटाचाही प्रसंग शर्मिला यांनी सांगितला. 

जयवंती यांच्यासोबत आधीपासून मैत्री होती. पण राज ठाकरे हे तिचे भाऊ आहेत हे अजिबात माहित नव्हतं याबाबतचा किस्सा सांगताना शर्मिला यांनी जयवंती यांच्यासोबत एकत्र काम करतानाच्या आठवणी जाग्या केल्या. यातच राज ठाकरे यांनी जोड देत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटाच्या प्रसंगाची थरारक कहाणी सांगितली. शर्मिला ठाकरे आणि जयवंती ठाकरे शिवसेना भवनाखाली असलेल्या बँकेत नोकरी करत होत्या. "ज्यावेळी शिवसेना भवनाबाहेर स्फोट झाला तेव्हा बँकेच्या काचा फुटून थेट यांच्या अंगावर आल्या. नेमकं काय घडलंय हे यांना कळालच नाही. त्याही परिस्थितीत दोघी बाहेर आल्या आणि माझी बहिण इतकी धीट की ती बिनधास्तपणे मदतीसाठी पुढाकार घेत होती", असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

"आम्ही नेहमीप्रमाणं आमचं काम करत होतो. माझ्या बाजूलाच जयवंती बसायच्या. जोरात आवाज झाला आणि समोरील काचा फुटून आमच्या अंगावर पडल्या. त्यात आम्ही थेट दोघी धावत बाहेर आलो. त्यात समोरच पेट्रोल पंप होतं. जिथं बॉम्बस्फोट झाला तिथं एक माणूस चक्क जीवंत जळताना आम्ही पाहिला. जयवंती इतक्या कणखर की त्याही परिस्थितीत त्या मदतीला धावत होत्या. अखेर त्यांना आम्ही कसंबसं तिथून नेलं होतं. तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही", असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

राज-शर्मिला भेटीच्या आठवणीराज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी त्यांच्या कॉलेजच्या आठवणी देखील यावेळी सांगितल्या. दोघांची ओळख रुपारेल कॉलेजमध्ये असताना झाली होती. "तेव्हा राज ठाकरे विद्यार्थी सेनेचं काम पाहात होते आणि शिरीष पारकर आमचा कॉमन फ्रेंड होता. त्यानच आमची ओळख करुन दिली होती. त्यानंतर आमचं बोलणं आणि भेटणं होऊ लागलं होतं. विशेष म्हणजे आमची दोघांचीही कुटुंब एकमेकांना ओळखत होती. संपर्कात होती. पण आम्ही कधीच तसे संपर्कात नव्हतो", असं शर्मिला यांनी सांगितलं. आमच्यातील नातं पुढे घेऊन जाण्यासाठी राज यांनीच पुढाकार घेतला होता, असंही शर्मिला यांनी सांगितलं. 

राज यांना होता दुबईहून धमकीचा फोनराज ठाकरेंना दुबईहून जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता आणि तो फोन मीच उचलला होता, अशी एक आठवण शर्मिला ठाकरे यांनी सांगितली. राज ठाकरेंची व्यासपीठावरील आक्रमकता पाहता त्यांचे दौरे वगैरे, आंदोलनं यावेळी मनात धाकधूक असते का? असं शर्मिला ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एक किस्सा कथन केला. "आमच्या घरात आधी टेलिफोन ऑपरेटर वगैरे नव्हता. त्यावेळीही खूप फोन राज यांना यायचे आणि ते घरचे लोकच उचलायचे. एकदा एक फोन मीच उचलला होता आणि तो दुबईहून आला होता. त्याला नीट राहायला सांगा नाहीतर बघून घेऊ अशी धमकीच समोर आली होती. त्यामुळे असे प्रसंग होत असतात", असं शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :राज ठाकरेशर्मिला ठाकरेमनसेमुंबई बॉम्बस्फोट