बोगस पॅथॉलॉजी राजरोस सुरूच
By Admin | Updated: July 27, 2015 02:24 IST2015-07-27T02:24:20+5:302015-07-27T02:24:20+5:30
कोणत्याही गल्लीबोळातील एखाद्या लहानशा गाळ्यात पॅथॉलॉजी लॅब सुरू करून खुलेआमपणे निदानाचा काळाबाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करणार कोण

बोगस पॅथॉलॉजी राजरोस सुरूच
मुंबई : कोणत्याही गल्लीबोळातील एखाद्या लहानशा गाळ्यात पॅथॉलॉजी लॅब सुरू करून खुलेआमपणे निदानाचा काळाबाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करणार कोण? गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह राज्यात अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे जाळे घट्ट विणले गेले आहे. त्याकडे कानाडोळा करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्याशी होणारा खेळ थांबावा, यासाठी जिल्हास्तरावर ‘बोगस डॉक्टर शोध समिती’ची स्थापना करण्यात आली. पण, तरीही या अनधिकृत लॅब राजरोसपणे सुरूच आहेत.
वैद्यक शास्त्रात उपचाराची पहिली पायरी म्हणजे योग्य निदान. पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त, मूत्र, बॉडी फ्ल्युएड्सची तपासणी करून आजाराचे निदान करण्यात येते. या लॅबमध्ये तपासणी झाल्यावर अहवाल देण्याचा अधिकार हा एमबीबीएसनंतर पदव्युत्तर शिक्षण (पॅथॉलॉजी) घेतलेल्या डॉक्टरला तर तपासणी झाल्यावर अहवाल तपासून सही करण्याचा अधिकार एम.डी. पॅथॉलॉजिस्टला आहे. पण, अनेक ठिकाणी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (डीएमएलटी) अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्ती अहवालावर सररास सही करतात. त्यांना वैद्यकशास्त्राचे ज्ञान नसते. बोगस डॉक्टर शोध समितीने अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेणे आवश्यक आहे. यानुसार समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा दंडाधिकारी आणि अध्यक्ष पुनर्विलोकन समितीमार्फत विभागास प्रत्येक महिन्यास सादर केला पाहिजे, असे २०००मध्ये काढलेल्या परिपत्रकात नमूद आहे. पण, तरीही समितीची बैठक होत नाही, अथवा ते अहवाल सादर करत नाहीत. यामुळेच अनधिकृत लॅब सररास सुरू आहेत.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आता पॅथॉलॉजिस्टच्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहे. यामुळे पॅथॉलॉजी लॅबमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा बसू शकतो. काही डॉक्टर नर्सिंग होम आणि रुग्णालयांमध्ये साईड लॅब सुरू करतात.
यामध्ये एखादा डीएमएलटी झालेली व्यक्ती काम करत असते. साईड लॅबमध्ये अनेकदा चुकीचे अहवाल मुद्दामून
दिले जातात. यामुळे त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. हा प्रकारदेखील अत्यंत गंभीर आहे. तर, काही पॅथॉलॉजिस्ट हे एकाच वेळी अनेक पॅथॉलॉजी लॅबमध्ये नाव देतात. प्रत्यक्षात ते त्या लॅबमध्ये जातही नाहीत.
तिथे दुसराच डीएमएलटी अथवा तत्सम शिक्षण घेतलेली व्यक्ती लॅबमध्ये तपासण्या करत असते, असे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर परिषद कारवाई करू शकते.
बोगस डॉक्टर शोध समितीचे सदस्य
जिल्हा दंडाधिकारी - अध्यक्ष
जिल्हा पोलीस अधीक्षक - सदस्य
अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय (असल्यास) - सदस्य
जिल्हा शल्यचिकित्सक - सदस्य
जिल्हा आरोग्य अधिकारी - सदस्य
जिल्हा माहिती अधिकारी - सदस्य
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन - सदस्य
उप जिल्हा पोलीस अधीक्षक (मुख्यालय) - सदस्य सचिव
सजग नागरिकांनी पुढे यावे
पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी गेल्यावर
तिथे पॅथॉलॉजिस्ट नसेल, दिलेल्या रिपोर्टवर टेक्निशियनची सही असेल, रिपोर्टविषयी
डॉक्टर कन्सल्ट करणार नाहीत, असे लॅबवाल्यांनी सांगितल्यास त्या लॅबची चौकशी करायलाच हवी.
त्या लॅबमध्ये अनधिकृत काम चालू असल्याची खात्री पटल्यावर थेट पोलिसांकडे एफआयआर नोंदवू शकता. यानंतर पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करणे भाग आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडेदेखील तक्रार नोंदवता येते. यामुळे फोफावलेल्या अनधिकृत लॅब बंद होण्यास मदत होईल. यामुळे सामान्यांनी पुढे यायला हवे.
या विषयाकडे गांभीर्याने पाहावे
अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण, जर डॉक्टरांकडे आलेला रिपोर्ट पात्रता नसलेल्या व्यक्तीने अथवा स्कॅन सहीचा असल्यास त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला पाहिजे. रुग्णांनीही तपासणी अहवाल पूर्णपणे पाहून, डॉक्टरची सही पडताळूनच घेतला पाहिजे.
- डॉ. जयेश लेले, अध्यक्ष (महाराष्ट्र), इंडियन मेडिकल असोसिएशन
एखाद्या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने पॅथॉलॉजी लॅब चालवली जात असल्यास त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. कारण, हा अत्यंत नाजूक प्रश्न असून यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ होतो. एखादी पॅथॉलॉजी लॅब अनधिकृतरीत्या चालवत असल्याचे लक्षात आल्यावर सुमोटो घेऊन कारवाई करण्याचे अधिकार परिषदेकडे आहेत. पण, त्यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा परिषदेकडे नाही. यामुळेच अशा प्रकारच्या अनधिकृत लॅब बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. नागरिक, डॉक्टर संघटना, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांनी एकत्र येऊन परिषदेला मदत केली पाहिजे.
- डॉ. किशोर टावरी, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
एखाद्या आजाराचे चुकीचे निदान झाल्यामुळे अयोग्य औषधोपचारांमुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो. ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. या अनधिकृत लॅबमध्ये दररोज किमान २० रुग्ण तपासणी करून घेतात. हे प्रमाण लक्षात घेतल्यास रोजच्या रोज हजारो रुग्णांचा जीव धोक्यात आहे.
- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट