बेवारस बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
By Admin | Updated: December 16, 2015 02:44 IST2015-12-16T02:44:10+5:302015-12-16T02:44:10+5:30
कांदिवली येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना देवनार परिसरातील एका नाल्यात दोन सुटकेसमध्ये एका महिलेचे हात आणि धड वेगवेगळ्या अवस्थेत आढळल्याने एकच

बेवारस बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
मुंबई : कांदिवली येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना देवनार परिसरातील एका नाल्यात दोन सुटकेसमध्ये एका महिलेचे हात आणि धड वेगवेगळ्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून देवनार पोलीस तपास करत आहेत.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील परिसरातील इंडियन आॅईल कॉलनीजवळील नाल्यात या सुटकेस आढळून आल्या. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बांधकामाधीन इमारतीच्या सुरक्षारक्षकाचे लक्ष या बॅगेकडे गेले. त्याने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची वर्दी लागताच देवनार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुटकेस ताब्यात घेतली असता, त्यामध्ये एका ४० ते ४५ वर्षीय महिलेची हत्या करून तिचे हात आणि कपडे एका सुटकेसमध्ये आणि हात कापून वेगळे केलेले धड दुसऱ्या सुटकेसमध्ये आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहावरून दोन दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहे. परिसरातील प्रत्यक्षदर्शी शोधण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)