‘त्या’ मुलीचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: July 14, 2015 00:18 IST2015-07-14T00:18:14+5:302015-07-14T00:18:14+5:30

दिघा यादवनगर येथून हरवलेल्या शिवानी विश्वकर्माचा (५) मृतदेह सोमवारी त्याच परिसरातील खदान तलावात आढळला. ती चार दिवसांपूर्वी खेळण्यासाठी

The body of the girl was found | ‘त्या’ मुलीचा मृतदेह आढळला

‘त्या’ मुलीचा मृतदेह आढळला

नवी मुंबई : दिघा यादवनगर येथून हरवलेल्या शिवानी विश्वकर्माचा (५) मृतदेह सोमवारी त्याच परिसरातील खदान तलावात आढळला. ती चार दिवसांपूर्वी खेळण्यासाठी घराबाहेर गेली असता हरवली होती. अपहरण झाल्याच्या संशयावरून पोलिसांचा तपास सुरू असतानाच तिचा मृतदेह आढळला.
दिघा यादवनगर येथे राहणारी शिवानी महापालिकेच्या बालवाडीत शिकत होती. शुक्रवारी दुपारी आई - वडील घरात असताना खेळण्यासाठी ती घराबाहेर गेली. यानंतर ती परत घरी न आल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. अपहरणाच्या संशयावरून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली होती. परंतु ठोस कारण पोलिसांपुढे आले नव्हते. अखेर सोमवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या खदान तलावात शिवानीचा मृतदेह आढळला. खोदकामातून हा तलाव तयार झालेला आहे. हा आडोशाचा व दुर्गंधीचा भाग असल्याने सहसा तिकडे कोणी जात नाही. सोमवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका व्यक्तीला तलावात मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. हा मृतदेह पाण्याबाहेर काढला असता तो चार दिवसांपूर्वी हरवलेल्या शिवानीचा असल्याचे स्पष्ट झाले. साहाय्यक निरीक्षक राहुल खताळ यांनी ही माहिती दिली. खेळताना तलावात पडून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ऐरोली येथील फ्रेन्शिला वाझ (८) हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच शिवानीच्या मृत्यूची घटना घडली आहे. ऐरोली घटनेच्या पार्श्वभूमीवर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी हरवलेल्या शिवानीच्या शोधासाठी कंबर कसली होती. शिवानीच्या सुखरूप शोधासाठी प्रयत्न सुरू असतानाच तिचा मृतदेह आढळल्याने पोलिसांचीही निराशा झाली आहे. शिवानीची हत्या करून मृतदेह टाकल्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे. परंतु मृतदेहावर कसलीही जखम अथवा खुणा आढळलेल्या नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. तरीही तिच्यासोबत कोणता गैरप्रकार घडला आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे साहाय्यक निरीक्षक खताळ यांनी सांगितले. याकरिता तिचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

ऐरोली येथील फ्रेन्शिला वाझ (८) हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच शिवानीच्या मृत्यूची घटना घडली आहे. ऐरोली घटनेच्या पार्श्वभूमीवर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी हरवलेल्या शिवानीच्या शोधासाठी कंबर कसली होती. शिवानीची हत्या करून मृतदेह टाकल्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. परंतु मृतदेहावर जखम अथवा खुणा नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The body of the girl was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.