उल्हासनगरात मृतदेहांची हेळसांड
By Admin | Updated: December 14, 2014 23:28 IST2014-12-14T23:28:22+5:302014-12-14T23:28:22+5:30
मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहातील वातानुकूलित यंत्र बंद पडल्याने मृतदेहांना कल्याण-ठाणे येथे पाठविण्यात येत आहे.

उल्हासनगरात मृतदेहांची हेळसांड
सदानंद नाईक, उल्हासनगर
मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहातील वातानुकूलित यंत्र बंद पडल्याने मृतदेहांना कल्याण-ठाणे येथे पाठविण्यात येत आहे. यामुळे मृतदेहाची हेळसांड होत असून नातेवाईक व नागरिकांत संताप आहे. तसेच डॉक्टर, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, धूळखात पडलेले यंत्र, औषधे, शस्त्रक्रिया, आदींच्या समस्यांमुळे रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे.
कर्जत-कसारा, शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, ठाणे ग्रामीण भागातील तसेच रेल्वे अपघातातील मृतदेहांना रुग्णालय शवागृहात ठेवण्यात येते. मात्र, वातानुकूलित यंत्रात बिघाड झाल्याने १० दिवसांपासून मृतदेह कल्याण, ठाणेसह इतर ठिकाणी पाठविले जातात. मृतांच्या नातेवाइकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांची परवड होते.