Join us

वादळी वाऱ्यामुळे भाईंदरमध्ये बोट उध्वस्त; अन्य 3 बोटींचे सुद्धा नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 17:55 IST

पाऊस आणि वादळी वारा सुटल्याने भाईंदरच्या समुद्रात नांगरलेल्या 4 मच्छिमार बोटींचे दोरखंड तुटून किनाऱ्याला आदळल्या.

मीरारोड- अचानक पाऊस आणि वादळी वारा सुटल्याने भाईंदरच्या समुद्रात नांगरलेल्या 4 मच्छिमार बोटींचे दोरखंड तुटून किनाऱ्याला आदळल्या. त्यात एक बोट पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. शनिवारी रात्री अचानक पाऊस पडायला सुरवात झाली. मध्यरात्री नंतर जोरदार वादळी वारे वाहू लागले.  त्या मध्ये रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास उत्तनच्या भुतोडी बंदर येथील जीवन शक्ती ही मोठी मच्छीमार बोट समुद्रातील नांगरचा दोरखंड तोडून किनाऱ्या वरील खडकांना आदळली.

खडकांवर सातत्याने धडकत राहिल्याने बोटींचे तुकडे तुकडे झाले आहेत. बोटींचे इंजिन पासून अनेक सामान बुडाले आहे. मच्छिमार जाळीचे नुकसान झाले आहे. सबेस्टीन सायमन चिंचक ह्या नाखवाची बोट असून बोटीच्या तुकड्याला बिलगून कुटुंबातील महिला ऑक्साबोक्शी रडत होत्या. गावातील मच्छीमार मोठ्या संख्येने एकत्र जमून बोटींचे तुकडे, इंजिन, समान, जाळी जे सापडेल तसे बाहेर काढायचा प्रयत्न करत होते. बोट पूर्णपणे तुटल्याने नाखवाचे काही लाखांचे नुकसान झाले आहे. 

या शिवाय भुतोडी बंदर येथील ग्रेगरी साकोल यांची प्राजक्ता ही फायबर बोट तर पाली येथील संजय सोज यांची ईश्वरदूत बोट वाऱ्यामुळे दोरखंड तुटून किनाऱ्याला येऊन धडकल्या. चौक बंदर मधील बसत्याव मुंबईकर यांची जॉन पॉल ही समुद्रात नांगरलेली बोट सुद्धा किनारी धडकली. यात बोटींचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर बोटीवर घेऊन त्यांचे कुठे कुठे काय नुकसान झाले आहे याची पडताळणी मच्छिमार करत आहेत. समुद्राला भांग असल्याने बहुतांश बोटी ह्या किनाऱ्या पासून काही अंतरावर समुद्रात नांगरून ठेवलेल्या होत्या. मच्छिमारांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःहूनच मदतकार्य सुरू केले होते.  

टॅग्स :मुंबई