Join us

जॅकेट घालेपर्यंत बोट बुडाली अन् मी १५ मिनिटे पोहत होतो; वाचलेल्या प्रवाशाने सांगितला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 05:10 IST

समोरून गोल गोल फिरणाऱ्या स्पीड बोटीला पाहून भीती वाटली. ही बोट धडकणार, अशी भीती असतानाच अचानक काही क्षणातच बोट आमच्या बोटीला धडकली. प्रत्येकाची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बोटीने प्रवास करत असतानाच अचानक एक बोट फेऱ्या मारत असल्याचे दिसली. ती धडकेल या भीतीने आम्हाला धडकी भरली. अवघ्या काही क्षणांतच बोट धडकली आणि बोटीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. लाइफ जॅकेट हाती आले मात्र ते घालेपर्यंत बोट बुडाली. मी १५ मिनिटे जीव मुठीत धरून पोहत असल्याचा थरार प्रसंग नीलकमल बोटीतून वाचलेले प्रवासी आणि कर्नाटकचे रहिवासी अशोक राव यांनी सांगितले.

अशोक राव म्हणाले, मला पोहता येत होते म्हणून मी पोहत पुढे आलो. मात्र, बोटीत अनेक लहान मुले होती. गेट वेहून आम्ही आनंदात एलिफंटाच्या दिशेने निघालो. आठ किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर समोरून गोल गोल फिरणाऱ्या स्पीड बोटीला पाहून भीती वाटली. ही बोट धडकणार, अशी भीती असतानाच अचानक काही क्षणातच बोट आमच्या बोटीला धडकली. प्रत्येकाची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली.

३० मिनिटे तेथे कोणीच फिरकले नाहीत

बोट धडकल्याने बोटीत पाणी शिरले. आमच्या दिशेने लाइफ जॅकेट ते घालेपर्यंत बोट उलटून अपघात झाला. ३० मिनिटे तिथे कोणीच फिरकले नाही. पोहत गेट वेला पोहोचलो. येथे साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. बोटीवर १०० हून अधिक जण होते. १० ते १५ लहान मुले होती. डोळ्यादेखत त्यांनाही जीव वाचविण्यासाठी तडफडताना पाहिले. डोळ्यादेखत काहींचा मृत्यू पाहिला. मात्र माझा जणू पुर्नजन्म झाल्याचे राव यांनी सांगितले. ते कर्नाटकहून मुंबईत फिरण्यासाठी आले होते.

एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू 

बोट दुर्घटनेत नाशिकच्या राकेश नानाजी अहिरे, त्यांच्या पत्नी अक्षता राकेश अहिरे आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा मिथू यांचा मृत्यू झाला.

...म्हणून आम्ही तिघे वाचलो

राजस्थानहून मुंबईत खुर्ची बनविण्याचे काम करण्यासाठी आलेला नाथराम चौधरी (२४) दोन भावासोबत एलिफंटा लेणी पाहण्यासाठी बोटीने जात होता. नाथराम चौधरी त्यावेळी झालेल्या बोटीच्या अपघातात ते तिघेही बोटीबाहेर पाण्यात फेकले गेले. जेव्हा आम्ही पाण्यात फेकलो गेलो, तेव्हा आमचा मृत्यू होईल, असे वाटले. मात्र, लाइफ जॅकेटमुळे आमचा जीव वाचला, असे चौधरी याने सांगितले. तो म्हणाला की, लाइफ जॅकेटमुळे पाण्यामध्ये २० ते २५ मिनिटे तरंगत होतो. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी नाथरामचे दोन भाऊ सर्वांथा आणि जितू हे बोटींच्या टपावर जाऊन बसले होते.

तेलंगणावरून आले, अपघातात सापडले 

वी अनिल कुमार (३५) आणि अशोक नारकप्पा (४८) हे दोघे तेलंगणावरून मुंबईत बी अनिल कुमार कामाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांना बुधवारी मोकळा वेळ असल्याने ते गेटवे ऑफ इंडिया येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर, बोटीने एलिफंटा लेण्या बघण्यास निघाले. मात्र, ते बोटीच्या अपघातात सापडले. बी अनिल कुमार यांनी सांगितले की, 'बोटीने या ठिकाणी फिरण्याची माझी ही दुसरी वेळ आहे. मात्र, या अपघातामुळे मनात भीती निर्माण झाली असून, मी पुन्हा बोटीने प्रवास करणार नाही.' 

टॅग्स :भारतीय नौदलमुंबई