बोट दुर्घटना: ‘तो’ मला फसवून गेला; मृत दीपकचंद यांच्या पत्नीने फोडला टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 11:51 IST2024-12-20T11:51:17+5:302024-12-20T11:51:44+5:30
त्यावेळी त्याच्या सोबत त्यांचे अन्य नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.

बोट दुर्घटना: ‘तो’ मला फसवून गेला; मृत दीपकचंद यांच्या पत्नीने फोडला टाहो
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दीपकचंद वाकचौरे(४४) यांचा बोट दुर्घटनेत मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी दोन मृतदेह जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यामधील एक मृतदेह दीपक यांचा होता. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांची पत्नी वनिता आणि मुलगी तन्वी या जेजे रुग्णालयाच्या शवागारात आल्या होत्या. मृतदेह ताब्यात घेताच त्यांची पत्नी वनिता यांनी मला तो फसवून गेला, असे सांगत परिसरातच टाहो फोडला. त्यावेळी त्याच्या सोबत त्यांचे अन्य नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.
गोवंडी येथे राहणारे दीपकचंद वाकचौरे हे रिअल इस्टेट एजंटचे काम करत होते. बुधवारी ते कुणाला न सांगताच गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी फिरायला गेले. त्यांनी तेथून एलिफंटा येथे जाणारी बोट पकडली, त्यावेळी बोट अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गुरुवार सकाळपर्यंत वाकचौरे यांच्या कुटुंबातील कुणालाही काही माहीत नव्हते. दीपकचंद यांची मुलगी तन्वी चेंबूर येथील आचार्य कॉलेजमध्ये बारावीला शिकत होती. ते नेहमी मुलीला कॉलेजला सोडायला जायचे. बुधवारी मात्र ते घ्यायला न आल्याने तिने वडिलांना फोन करण्यास सुरुवात केली. मात्र, फोन बंद येत असल्याचे तिने घरी कळविले.
संध्याकाळपर्यंत फोन न लागल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. अखेर पोलिसांनी वाकचौरे यांच्या नातेवाइकांना जे जे रुग्णालयात दोन मृतदेह आणले असून त्यांची ओळख पटत नसल्याचे सांगून एकदा येऊन जाण्यास सांगितले. त्यावेळी नातेवाईक आल्यावर अखेर ते दीपकचंद असल्याची ओळख पटली. तसेच त्यांची दुचाकी गेटवे ऑफ इंडिया येथे सापडली.
वाकचौरे यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट गायब असल्याचे लक्षात आल्याचे खरात यांनी सांगितले. वाकचौरे हे कुणासोबत बोटीवर गेले होते, गायब झालेल्या दागिन्यांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.
त्याला फिरायची खूप आवड होती
दीपकचंद यांना दोन मुले असून यात मुलगा सचिन शाळेत, तर मुलगी तन्वी कॉलेजमध्ये आहे. त्यांची पत्नी वनिता या गृहिणी आहेत. त्यांचे मामा दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले की, त्याला फिरायला जायची खूप आवड होती. ते अधून मधून फिरायला जात असत. बुधवारी त्यापद्धतीने कुणाला न सांगताच फिरायला गेले. तो एकटाच घरातील कमावता व्यक्ती होता.
हैदराबादहून बोटीच्या मेंटेनन्ससाठी आलेल्या दीपकला मृत्यूने गाठले
हैदराबाद येथील दीपक तिलेकर (२८) नेव्ही बोटीच्या मेंटेनन्ससाठी दर पंधरा दिवसांनी मुंबईत येत होता. बुधवारी जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा दीपक मेंटेनन्सच्या कामासाठी बोटीवर होता. त्याचा मृतदेह पोलिसांनी जेजे रुग्णालयात आणला होता. त्याची ओळख पटल्यानंतर त्याचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी गुरुवारी जेजे रुग्णालयात आले होते. दीपक बोट मॅकेनिक असून तो खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या कंपनीला नेव्हीच्या बोट मेंटेनन्सचे काम मिळाले होते. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी मुंबईत तो येत असे. दीपकला चार भाऊ असून तो सर्वात धाकटा होता. तो गेली पाच वर्षे या कंपनीत कामाला होता. दुर्घटना घडल्यानंतर कंपनीकडून त्याचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आल्याची माहिती त्याचा भाऊ श्रावण तिलेकर यांनी दिली.