Join us

CoronaVirus Mumbai: अँटीजन चाचण्यांचे २० लाख किट घेणार; एका चाचणीचे नऊ रुपये, अर्ध्या तासात अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 20:25 IST

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात असल्याने सर्व निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई - दक्षिण आफ्रिका, युरोप या देशांमध्ये थैमान घालणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूचे आतापर्यंत केवळ दोन बाधित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तरीही खबरदारी म्हणून पालिकेने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी २० लाख अँटीजन चाचण्यांचे कीट खरेदी केले जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ नऊ रुपयांमध्ये ही चाचणी होऊन अर्ध्या तासांमध्ये अहवाल हातात पडणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे.  

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात असल्याने सर्व निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. मात्र ओमायक्रॉनचा प्रसार जगभरात वेगाने होत असल्याने पालिका प्रशासनाने मुंबईत खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे प्रवाशी तसेच मुंबईतील दररोज ३५ ते ४० हजार लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये सद्यस्थितीत सुमारे अडीशे बाधितांची नोंद होत आहे. खबरदारी म्हणून एक लाख खाटा दोन दिवसांत सक्रिय करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  

* पालिकेने अँटीजन कीट खरेदी करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेला पाच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. किमान एका चाचणीसाठी नऊ रुपये दर ठेकेदाराने लावला आहे. स्पर्धा वाढल्याने कंपन्यांकडून कमी दर मिळाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

* या खरेदीमध्ये सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या ५० हजार कीट्स घेण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशन, मॉल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके अशा ठिकाणी वेगाने चाचण्या करण्यासाठी या कीट्सचा फायदा होणार आहे. 

* पालिकेच्या चाचणी केंद्रात अँटीजन चाचणी विनामूल्य केली जाते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या