Join us

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडला तडे? पंतप्रधान कार्यालयाने दखल घेताच बीएमसीने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:13 IST

मुंबईच्या कोस्टल रोडवर तडे गेल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

BMC on Mumbai Coastal Road: सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला कोस्टल रोडला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १४ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडला खड्डे पडून ते भरण्यासाठी पॅच लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळी दरम्यानच्या भागातील खड्डा मुंबई महापालिकेने डांबराने भरले गेल्याचे म्हटलं जात आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

कोस्टल रोडवर ठिकठिकाणी असलेल्या डांबरी पॅचचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कोस्टल रोडच्या हाजी अली जवळच्या मार्गावरील हा व्हिडीओ असून, रस्त्याला तडे गेल्याचे म्हटलं जात आहे. या व्हायरल व्हिडीओची पंतप्रधान कार्यालयानेही दखल घेत याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने मुख्य सचिवांना याबाबतची माहिती विचारली आहे. दुसरीकडे, पालिकेने स्पष्टीकरण देताना हाजी अली पुलाजवळील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम पावसाळ्यापूर्वीच करण्यात आल्याचे  म्हटलं आहे. या भागात असलेल्या सांध्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटलं.

या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने मुख्य सचिवांकडून माहिती मागवण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ शेअर करताना एका सोशल मिडिया युजरने, हे खूपच निराशाजनक आहे, १४ हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी पॅचवर्क दिसत आहे. याला मुंबई महापालिका जबाबदार आहे, असं म्हटलं होतं. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या उद्घाटनाची घाई करण्यात आली आणि त्याचाच हा परिणाम असल्याचे अनेकांनी म्हटलं.

दुसरीकडे, पुलाच्या सांध्यांवर डांबर टाकताना ते बाजूलाही पडल्यामुळे त्यामुळेच रस्ता खाली वर झाला असं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.  सपाटीकरणासाठी डांबराचा थर टाकण्यात आले असून हे सर्व काम नियोजनानुसार होत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा तडा गेलेला नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

"उत्तर मार्गिकेवरील हाजी अली जवळील कोस्टल रोडच्या या भागाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती पालिकेकडून करण्यात आली. ही दुरुस्ती भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात आली आहे. आवश्यकतेप्रमाणे हे थर काढून येथे अस्फाल्टचे नवीन थर लावण्यात येतील. पावसाळ्यात खड्डे पडू नयेत म्हणून हा थर बसवण्यात आला आहे. काही ठिकाणी, सांध्यांमध्ये थोडासा बदल झाला होता, ज्याला स्थिर करण्यासाठी हा थर लावला होता. येत्या १५ ते २० दिवसांत हा रस्ता पुन्हा जुन्या स्थितीत येईल," असं महापालिकेने म्हटलं.

दरम्यान, मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट हा शहरातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा सर्वोच्च अभियांत्रिकी मानकांसह डिझाइन केलेल आहे. त्यामुळे  जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे गोंधळात पडू नका असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका