Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC: निवडणुकीत अधिकारी ३८ एसी गाड्यांतून फिरणार, गरजेनुसार वाहनांची संख्या वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:42 IST

BMC Election 2025: मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जानेवारी २०२६ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांची धावपळ सुरू झाली असतानाच दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेने अधिकाऱ्यांसाठी पेट्रोल आणि सीएनजीवरील ३८ एसी वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेला अंदाजे १ कोटी ४३ लाख ३२ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. 

गेल्या साडेतीन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मोकळा झाला आहे. ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी मतदान केंद्र, मतदारांना देण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा यावर भर दिला आहे. महापालिकेचे हजारो अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या विविध कामांमध्ये गुंतले जाणार आहेत. यातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांना त्यांचे कामकाज जलद व सुरळीत पार पाडता यावे यासाठी पालिकेने ४ महिन्यांकरिता पेट्रोल, सीएनजीची ३८ एसी वाहने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. गरजेनुसार गाड्या वाढविण्यात याव्यात, असेही आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. 

पालिकेने मागविले टेंडर; कुणी मारली बाजी?

पालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत तीन कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता. त्यातील मे. एम. के. निर्मल इंटरप्रायझेस यांची निवड झाली आहे. निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची ही वाहनव्यवस्था निवडणुकीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कामकाज सुलभ करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BMC to rent 38 AC cars for election officials.

Web Summary : With Mumbai municipal elections looming, BMC will rent 38 AC vehicles for officials, costing ₹1.43 crore. This ensures smooth election operations following court orders to hold elections before January 31. More vehicles may be added as needed.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२५मुंबई