Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसाठी 'हायब्रिड' गाड्या; २ कोटी खर्चून BMC कडून नव्या वाहनांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:21 IST

महापौर, उपमहापौर, विषय समिती अध्यक्षांच्या दिमतीला नवी कोरी वाहने

BMC Mayor : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. महापौरांना नवीन कोरी 'इनोव्हा एन', तर उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी 'स्कॉर्पिओ' वाहने महापालिका प्रशासनाकडून दिली जाणार आहेत.

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती, शिक्षण, सुधार तसेच बेस्ट समिती अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर विशेष समित्या आणि १८ प्रभाग समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

त्यामुळे मागील पावणे चार वर्षांमध्ये नगरसेवक आणि महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला होता. त्यामुळे आता नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाने पार पाडली आहे.

वाहनांची आरटीओ नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या ताफ्यात ती दाखल होतील.

रंगांचे डिझाइन 

महापौरांसाठी ईव्ही आणि पेट्रोलवर आधारित हायब्रिड 'इनोव्हा एन' हे वाहन खरेदी केले आहे. सध्या महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त हे वाहन वापरत आहेत. वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी १२ 'स्कॉर्पिओं'चीही खरेदी केली जात आहे. अध्यक्षांची वाहने सहज ओळखता यावीत, यासाठी यावर भगव्या रंगाच्या पट्ट्यांचे डिझाइन तयार केले आहे.

दोन कोटी रुपयांचा खर्च

'इनोव्हा'ची किंमत ३० लाख रुपये, तर एका स्कॉर्पिओची किंमत १८ लाख रुपये आहे, असा एकूण दोन कोटी १६ लाख रुपये खर्च या वाहनांवर करण्यात येणार आहे. तर, प्रभाग समिती अध्यक्षांसाठी भाड्याने वाहने घेण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह, पद यांचा उल्लेख या वाहनांवर असेल. उपायुक्तांच्या गाड्यांवर पांढऱ्या रंगाची पट्टी, तर सहायक आयुक्तांच्या गाड्यांवर लाल पट्टी आणि महापौर व अध्यक्षांच्या वाहनांवर भगव्या रंगाची पट्टी असणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Mayor, Deputy Mayor to Get Hybrid Cars: BMC Spending Crores

Web Summary : Mumbai's mayor, deputy mayor, and committee heads will receive new vehicles, including hybrid Innovas and Scorpios, costing BMC ₹2.16 crore. The vehicles will have distinct saffron stripes.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहापौर