शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला आहे. खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात होते.
१ लाख रुपयांच्या रोख मुचलक्यावर सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झाला आहे. १७ जानेवारी २०२४ रोजी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते. मुंबई मनपाला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण आणि अमोल किर्तिकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. हा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात होता. कारण सूरज चव्हाण हे युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी अत्यंत महत्वाचा दुवा राहिले होते. आदित्य ठाकरेंचे ते निकटवर्तीय मानले जात होते. युवासेनेचा सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचा विश्वासू शिलेदार आणि पुढे जाऊन ठाकरे गटाचा सचिव असा सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.