Join us

थकीत करवसुलीचे महापालिकेपुढे आव्हान; काही वर्षांपासूनची जुनी थकबाकी २,२५०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:59 IST

यंदा वार्षिक मालमत्ता कर संकलनातून ५२०० कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नवीन कर प्रणालीसह कराची थकबाकी, न्यायप्रविष्ट प्रकरणे यामुळे  कर देयके देण्यास झालेल्या विलंबाचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या २२६५६ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीचे आव्हान पालिकेसमोर आहे. यंदा वार्षिक मालमत्ता कर संकलनातून ५२०० कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

मुंबईतील निवासी मालमत्तेचे भांडवली मूल्य १० लाख रुपये असल्यास मालमत्ता कर २००० रूपये येतो. दरवर्षी ३० जूनपर्यंत पालिकेमध्ये मालमत्ता कर भरणे आवश्यक असून त्या तारखेपर्यंत कर न भरल्यास थकबाकीच्या रकमेवर २ टक्के दंड आकारला जातो. मुंबईत  ५०० चौरस फूट क्षेत्रफळाखालील सर्व निवासी  मालमत्ता आणि सरकारने निर्दिष्ट केलेल्या राजनैतिक किंवा कॉन्सुलर संबंधित मालमत्तांना कर भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. मालमत्ता विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर २० टक्के करही आकारला जातो. म्हणजेच ६३,००,००० रुपयांच्या निव्वळ भांडवली नफ्यासाठी, एकूण १२,९७,८०० रुपये एवढा कर आकारला जातो, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मालमत्ता करातील उत्पन्न 

३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मालमत्ता करापोटी ५२२९ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. पालिकेला २०२४-२५ या वर्षासाठी मालमत्ता करातून मिळणारे सुधारित उत्पन्न ६,२०० कोटी रुपये असून २०२४-२५ चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज ४,९५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आता २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी, कराचा प्रस्तावित  अंदाज ५,२०० कोटी रुपये इतका आहे.

कसा शोधाल मालमत्ता खाते क्रमांक?

महापालिकेच्या मालमत्ता कर  पोर्टलवर तुमचा मालमत्ता खाते क्रमांक (पॅन) शोधण्यासाठी, होम पेजवरील प्रॉपर्टी टॅक्स पर्याय निवडा.

तेथे तुमचा वॉर्ड नंबर, घरमालकाचे  नाव आणि पत्ता शोधा. त्याद्वारे तुमचा  मालमत्ता खाते क्रमांक मिळेल.

दंडाची तरतूद काय?

मालमत्ता कर निर्धारित कालावधीत न  भरल्यास मुंबई महापालिका कायद्याच्या कलम २०३, २०४, २०५ आणि २०६ नुसार, थकबाकीदार मालमत्तेतील वस्तू जप्त करण्याची आणि लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. 

कर वसुलीसाठी पालिकेने झोपडपट्ट्यांमधील सुमारे ८०० व्यावसायिक आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यापैकी अनेक आस्थापनांमध्ये गोदामे, कार्यशाळा, हॉटेल्स आणि दुकानांचा समावेश आहे. २०२५-२६ मध्ये झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक युनिट्सकडून ३५० कोटी रुपये वसूल होण्याची अपेक्षा आहे.

सर्वाधिक करसंकलन

२६ मे २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पश्चिम उपनगरांमधून सर्वाधिक २,५२७ कोटी रुपये कर संकलन करण्यात आले आहे, तर  शहरातून १,५५७ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमधून ९७७ कोटी रुपये मालमत्ता कराचे संकलन झाले आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका