Join us

तुमच्या परिसरातील कचरा वेळेत उचलला जातो का? कचरा वाहनांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट’ यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 10:00 IST

कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

मुंबई : कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. भाडेतत्त्वावरील वाहनांवर ही यंत्रणा यापूर्वीच बसवण्यात अली आहे. मात्र, पालिकेच्या मालकीच्या वाहनांवर आता ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याने या वाहनांची सद्य:स्थिती समजणे सोपे होणार आहे.

कचरागाड्यांचे चालक त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का, दिवसभरात कोणत्या वेळी कचरा उचलला जातो, किती वेळा कचरा उचलला जातो,  कचऱ्याची विल्हेवाट निश्चित ठिकाणी केली जात आहे की नाही, यावर या यंत्रणेद्वारे लक्ष ठेवता येणार आहे. सध्या या यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून निवडणुकीनंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल. पालिकेकडे स्वमालकीची  १३००, भाडेतत्त्वावरील १५०० वाहने आहेत. यापैकी पालिकेच्या मालकीच्या वाहनांवर सध्या ही यंत्रणा नाही. 

ग्रॅण्ट रोड येथे केंद्र-

१) कचरा वाहून नेणारे डंपर, स्वीपिंग मशीन, बीच क्लिनिंग मशीन आदी वाहनांचा ताफा पालिकेकडे आहे. व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट यंत्रणेचे नियंत्रण करण्यासाठी पालिका ग्रॅण्ट रोड येथे केंद्र उभारणार आहे. 

२) भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांवर बसवलेली यंत्रणाही भाडेतत्त्वावरील आहे. दरम्यान, पालिकेने अलीकडच्या काळात स्वच्छ मुंबई मोहिमेवर भर दिला आहे. रस्ते धुण्याची  कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. 

३) झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी एकच कंत्राटदार नेमला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अजून कंत्राटदार मिळालेला नाही. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका