Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी MIM भाजपाला पाठिंबा देणार? असदुद्दीन ओवेसींचं मोठं विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:33 IST

BMC Elections Result: मुंबई महानगपालिकेमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेला काठावरचं बहुमत मिळालेलं असल्याने आता अकोट प्रमाणेच मुंबईमध्येही एमआयएम भाजपाला पाठिंबा देणार का? असं विचारलं जात आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाने लक्षवेधी कामगिरी केली आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये मिळून एमआयएमने १२५ हून अधिक जागांवर विजय मिळवला. त्यातही मुंबईत एमआयएमने जिंकलेल्या ८ जागा ह्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात मुंबई महानगपालिकेमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेला काठावरचं बहुमत मिळालेलं असल्याने आता अकोट प्रमाणेच मुंबईमध्येही एमआयएम भाजपाला पाठिंबा देणार का? असं विचारलं जात आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम भाजपा आणि एनडीएला पाठिंबा देणार का? असे विचारले असता असदुद्दीन ओवेसी यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे. भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, असे ओवेसी यांनी सांगितले. यावेळी अकोट नगर परिषदेमध्ये घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना ओवेसी म्हणाले की, अकोटमध्ये एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक आलेल्या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला. ही बाब म्हणजे गंभीर शिस्तभंग आहे, असे ओवेसी म्हणाले.

ओवेसी पुढे म्हणाले की, या प्रकरणी संबंधितांना आधीच कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. तसेच अमरावती दौऱ्यावेळी संबंधित नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय हा कुणी व्यक्ती नव्हे तर पक्षच घेईल, असे बजावले होते. तरीही ही चूक घडल्याने एमआयएमच्या राज्य अध्यक्षांनी त्वरित कारवाई करत संबंधित नगरसेवकांना निलंबित केलं आहे. एमआयएम हा पक्ष कुठल्याही परिस्थितीत भाजपा किंवा एनडीएसोबत जाणार नाही, असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनअसदुद्दीन ओवेसी