Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॉट रिचेबल असलेल्या उद्धवसेनेच्या 'त्या' नगरसेविका अखेर संपर्कात, नार्वेकरांची घेतली भेट, होत्या कुठे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:41 IST

BMC Elections 2026 Result: उद्धवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक गट नोंदणीसाठी एकत्र आले असताना डॉ. सरिता म्हस्के या नगरसेविका नॉटरिचेबल झाल्याने खळबळ उडाली होती. डॉ. म्हस्के ह्या शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सरिता म्हस्के ह्या पुन्हा एकदा उद्धवसेनेच्या संपर्कात आल्या.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर आता महापौर निवडणुकीसाठी महायुती आणि उद्धवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, बुधवारी उद्धवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक गट नोंदणीसाठी एकत्र आले असताना डॉ. सरिता म्हस्के या नगरसेविका नॉटरिचेबल झाल्याने खळबळ उडाली होती. डॉ. म्हस्के ह्या शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सरिता म्हस्के ह्या पुन्हा एकदा उद्धवसेनेच्या संपर्कात आल्या असून, त्यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. दरम्यान, आज सकाळी डॉ. सरिता म्हस्के ह्या मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, त्यानंतर त्या मुंबई महानगरपालिकेतील उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटामध्ये नावनोंदणी करतील, असे सांगण्यात येत आहे.

डॉ. सरिता म्हस्के ह्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपाच्या आशा तायडे यांचा पराभव केला होता. मात्र काल झालेल्या उद्धवसेनेच्या गट नोंदणीच्या बैठकीला त्या अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. तसेच निवडून येताच ठाकरेंची साथ सोडल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात येत होती. मात्र रात्री उशिरा सरिता म्हस्के या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवास्थानी दाखल झाल्या आणि त्यांनी आपण उद्धवसेनेसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. आता गेल्या २४ तासांत त्या कुठे होत्या याबाबतची माहिती त्या प्रसारमाध्यमांशी बोलल्यानंतरच समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बहुमत मिळालं आहे. २२७ नगरसेवक संख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेला मिळून ११८ जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपाने ८९ तर शिंदेसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ७२ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये उद्धवसेनेला ६५ जागा, शिंदेसेनेला २९ जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसला २४ आणि एमआयएमला ८ जागा मिळाल्या आहेत.  

टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकाशिवसेना