दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेसाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार)ने माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवली आहे. मलिक यांनी यावेळी उमेदवार निश्चितीपासून पक्षाच्या मुंबईतील प्रचाराची रणनीती निश्चित केली. मागील २५ ते ३० वर्षे मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या लुटीत शिवसेनेबरोबर भाजपचाही सहभाग होता, असा आरोप त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रवादी एकत्र असतानाही मुंबईत फारशी ताकद नव्हती, आता तर दोन पक्ष झाले आहेत आणि तुम्ही जास्त जागा जिंकण्याचा दावा करत आहात.
मलिक : पूर्वी उमेदवार निवड करताना योग्य लक्ष दिले जात नव्हते. उमेदवाराचा प्रभागात किती प्रभाव आहे. तेथे जातीचे समीकरण कसे आहे, तिथल्या मतदारांचा कल काय आहे? हे बघून यंदा आम्ही उमेदवारांची निवड केली आहे.
तुमची थेट लढत कुणाशी आहे? महायुतीशी की उद्धव-मनसे युती अथवा काँग्रेस?
मलिक : धर्म, भाषा, प्रांताच्या नावावर राजकारण करणाऱ्यांविरोधात आम्ही आहोत. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण करत आहोत.
धर्माचे राजकारण यावेळी प्रचारात जास्त दिसत आहे का?
मलिक : धर्माच्या आधारे मतदारांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे, पण ते होत नसल्याने भाजप अस्वस्थ आहे. सर्व मुसलमान बांगलादेशी आहेत, हे भासवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. हा मुद्दा उपस्थित करून हिंदू बांधवांना घाबरवले जात असून, द्वेषाचे राजकारण सुरू आहे.
मुंबई महापालिका कंत्राटदारांच्या हातात गेल्याचा आरोप होत आहे.
मलिक : मुंबई महापालिकेचा ब्रिटिशकालीन कायदा आहे. त्यानुसार आयुक्त निर्णय घेतात आणि ते फक्त मान्यतेसाठी सभागृहासमोर येतात. मला वाटते, कायद्यात बदल करून निवडून आलेल्या नगरसेवकांना अधिकार दिले पाहिजेत. पण, त्यातही चेक ॲण्ड बॅलन्स हवे.
मागील ३० वर्षांत महापालिकेतील भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो, आपले काय मत आहे?
मलिक : या काळात शिवसेनेबरोबर भाजपही सत्तेत होता. भाजपचा उपमहापौर, स्थायी समितीत भाजपचे नगरसेवक असायचे. भाजप आता आरोप करते, पण तेव्हा ‘स्टॅण्डिंग कमिटी, अंडरस्टॅडिंग कमिटी’ होती.
दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येण्याची चर्चा आहे.
मलिक : दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत, ही दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही इच्छा आहे. पण, अंतिम निर्णय शरद पवार आणि अजित पवारच घेतील. माझी तर इच्छा आहे दोन्ही पक्ष एक व्हावेत.
Web Summary : Nawab Malik eyes Mumbai victory, alleging BJP's corruption involvement. He advocates for unified NCP, empowering corporators, and combating divisive politics. The final decision rests with Sharad and Ajit Pawar.
Web Summary : नवाब मलिक मुंबई में जीत चाहते हैं, BJP पर भ्रष्टाचार का आरोप। वे एकीकृत NCP, पार्षदों को सशक्त बनाने और विभाजनकारी राजनीति का मुकाबला करने की वकालत करते हैं। अंतिम फैसला शरद और अजित पवार का होगा।