Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझं मत, नॉट फॉर सेल', 'माझं मत देशासाठी, भविष्य सुरक्षित करण्यासाठी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:00 IST

मतटक्का वाढवण्यासाठी पालिकेकडून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने 'माझं मत, नॉट फॉर सेल' आदी घोषवाक्यांखाली जनजागृती अभियान सुरू केले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्विप)' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतदार जागृतीसाठी पालिकेने सविस्तर कृती आराखडा तयार केला असून, विविध विभाग, अधिकारी व यंत्रणेमार्फत अंमलबजावणी सुरू आहे. या निवडणुकीत एक कोटी तीन लाख ४४ हजार ३१५ नागरिक मतदानासाठी पात्र आहेत.

मुंबईतील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, मॉल, चौपाटी अशा एकूण २५ ठिकाणी फ्लॅश माँब तसेच प्रत्येक मत किती महत्त्वाचे आहे, याबाबत काही प्रतिष्ठित व्यक्तींकडून जागृती केली जात आहे. शिवाय पालिकेच्या शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभातफेरी, आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.मतदारांना आपल्या मताचे महत्त्व कळावे, त्यांनी निर्भयपणे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला मतदान करावे, यासाठी पालिकेने जनजागृती अभियान हाती घेतले आहे.

सोसायट्यांमध्ये सूचना फलक

गृहनिर्माण संस्थांद्वारेही मतदार जागृतीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या सहकार्याने सोसायटी अध्यक्ष व सचिवांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील ६२ चित्रपटगृहांतील २ २०० पडद्यांवर मतदार जनजागृती करणारी ३० सेकंदांची चित्रफीत प्रदर्शित केली जात आहे. एसटी स्थानकांवर शासकीय कार्यालयांमध्ये स्टिकर, ध्वनिक्षेपकांद्वारे घोषणा, राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत विद्यार्थी उपक्रम, हॉटेल व्यावसायिकांमार्फत मतदार जागृतीचे संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.

मतदान हक्क बजावा; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले डिजिटल पोस्टर्स, बॅनर, चित्रफिती, पालिकेने परवानगी दिलेली डिजिटल होर्डिंग्ज, पालिकेच्या २४ नागरी सुविधा केंद्रांमधील स्क्रीन तसेच मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, मेट्रो, एमएसआरडीसी या प्राधिकरणांमार्फत डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. मतदारांनी १५ जानेवारीला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai civic body urges voters: Your vote is not for sale.

Web Summary : Mumbai's civic body launches voter awareness campaign urging citizens to vote ethically. Initiatives include flash mobs, school programs, and digital displays at public places. The aim is to increase voter turnout in upcoming elections.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६निवडणूक 2026