Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:15 IST

ज्या मतदारांची नावे दुबार यादीमध्ये आहेत, अशा मतदारांची दोन ओळखपत्रे तपासली जातील

मुंबई : मतदानाच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा लागणार आहे. मात्र, ज्या मतदारांची नावे दुबार यादीमध्ये आहेत, अशा मतदारांची दोन ओळखपत्रे तपासली जातील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

यावेळी दुबार मतदारांकडून आपण एकाच मतदान केंद्रावर मतदान करणार असे हमीपत्र (अर्ज ब) ही भरून घेतले जाणार आहे. त्यामुळे आपल्या नावापुढे २ स्टार असलेल्या मतदारांनी मतदान करताना २ ओळखपत्रे बाळगावीत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत जवळपास १ कोटी ३ लाख मतदार हे यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. मात्र, यातील १ लाख ६८ हजार मतदार दुबार असल्याचे निरीक्षण पालिका प्रशासनाने नोंदवले आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट १,२६,६१६ घरांना भेट देऊन पडताळणी केली. यापैकी ४८,३२८ मतदारांनी फॉर्म अ सादर केला. या फॉर्ममध्ये, दुबार मतदारांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शविली. ४८ हजार दुबार मतदारांकडून दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले आहे. अजूनही ७८ हजार दुबार मतदारांकडून हमीपत्र भरणे बाकी असून, ते प्रत्यक्ष मतदान केंद्रावर लिहून घेतले जाणार आहे.

या १२ पुराव्यांपैकी सादर करा दोन पुरावे

१) पासपोर्ट २) आधार ओळखपत्र ३) ड्रायव्हिंग लायसन्स ४) पॅन कार्ड ५) केंद्र शासन / राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र (फोटो) सह दिलेली ओळखपत्रे ६) राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र (फोटो) असलेले पासबूक ७) दिव्यांग दाखला ८) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड) ९) निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.) १०) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा /विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र ११) स्वातंत्र्य सैनिकाचे ओळखपत्र १२) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड

टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६भारतीय निवडणूक आयोग