Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावी मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी; पुनर्विकासाचा महायुती अभेद्य, उद्धवसेना, काँग्रेस कुणाला तारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:35 IST

यावेळीही हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. 

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धवसेनेने धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावरून मुंबईत प्रचाराचे रान पेटविले होते. आता महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. यावेळीही हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. 

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांचा धारावीत प्रभाव आहे. पालिका निवडणुकीत येथे काँग्रेस, ठाकरे बंधू की, महायुतीला कौल मिळतो याकडे मुंबईचे लक्ष लागले आहे. धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मुलुंड, कुर्ला येथे धारावीकरांना पाठविण्यात येणार आहे. खा. वर्षा गायकवाड, आ. आदित्य ठाकरे, आ. ज्योती गायकवाड यांनी कुंभारवाडा, कारखान्यांना भेटी देऊन धारावीकरांची मते जाणून घेत पुनर्विकासाला विरोध केला होता. 

धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करावे, त्यांना ५०० चौरस फुटांचे घर द्यावे, या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. यासोबतच येथील अस्वच्छता, पाणी समस्या, पायाभूत सुविधांवरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आता पालिका निवडणुकीतही हेच मुद्दे प्रचारात आणण्यात येत आहेत.

धारावीतील ७ पैकी ४ प्रभागांत मुस्लीम, २ प्रभागांत मराठी, तर एका प्रभागात दाक्षिणात्य मतदार मोठ्या संख्येने आहेत. लोकसभेला उद्धवसेना, तर विधानसभेत काँग्रेसकडे येथील मतदारांनी प्रतिनिधित्व सोपविले. येथे शिंदेसेनेचे ४, भाजपने ३, उद्धवसेनेने ५, तर मनसेने २ उमेदवार आहेत.

मतविभाजनाचा युतीला मिळणार लाभ?

लोकसभा, विधानसभा एकत्र लढून उद्धवसेना, काँग्रेसने धारावीतून मोठे मताधिक्य मिळविले होते. मात्र, पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष आमने-सामने उभे असून त्यांच्यातच प्रमुख लढत असल्याचे चित्र आहे.

२०१७ च्या पालिका निवडणुकीत येथील ७ प्रभागात एकसंध शिवसेनेला ३, काँग्रेसला २, तर मनसे, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. मात्र, आता महाविकास आघाडीतील विभाजनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा फायदा भाजप, शिंदेसेना युतीला होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काँग्रेसचे सात उमेदवार

काँग्रेसने सातही प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग १८५ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना उमेदवारी मिळाली आहे. बाहरेचा उमेदवार असल्याची टीका करत उद्धवसेनेने या दाक्षिणात्यबहुल प्रभागात माजी नगरसेवक टी. एम. जगदीश यांना मैदानात उतरविले आहे.

प्रभाग १८३ मधून शिंदेसेनेच्या 3 माजी नगरसेविका वैशाली शेवाळे यांच्यासमोर मनसेच्या पारूबाई कटके यांचे आव्हान असेल. प्रभाग १८७मधून धारावी बचाव आंदोलनातील शेकापच्या कार्यकर्ती अॅड. साम्या कोरडे मैदानात उतरल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dharavi redevelopment central to election campaigns; whose side are voters on?

Web Summary : Dharavi's redevelopment is a key election issue. Congress and Uddhav Sena are campaigning, promising better housing. The focus is on local resettlement, improved facilities, and voter preferences amidst political divisions. All eyes are on who will win the municipal elections.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६धारावी