Join us
Daily Top 2Weekly Top 5

चला, कोस्टल रोडवर पायी फिरायला; विहारपथ होणार खुला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:00 IST

विहार पथावर प्रवेश विनामूल्य आहे

मुंबई: मुंबईतील नागरिक तसेच पर्यटकांना सागरी किनाऱ्याचा आनंद लुटता यावा, यासाठी महापालिकेने कोस्टल रोडलगत मरिन ड्राइव्हप्रमाणे वरळी सी-फेसपर्यंत विहारपथ (प्रोमोनेड) बांधला जात आहे. त्यापैकी प्रियदर्शनी पार्क ते हाजीअली आणि बडोदा पॅलेस ते वरळी सी-फेस अशा दोन टप्प्यांतील ५.२५ किमी लांबीच्या या विहारपथाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

त्याचबरोबर चार पादचारी भुयारी मार्गाचेही लोकार्पण होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ४:३० ५.२५ किमी लांबीचा विहारपथ खुला होत आहे. वाजल्यापासून नागरिकांना विहार पथावरून मनसोक्त फेरफटका मारता येणार आहे.

नरिमन पॉइंटपासून दहीसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. या रस्त्यालगत उभारण्यात येत असेलल्या विहारपथाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, हाजीअली ते बडोदा पॅलेस या टप्प्यातील काही कामे बाकी असून, हा भाग उशिरा खुला करण्यात येणार आहे.

दरम्यान, कोस्टल रोड (दक्षिण) सध्या सकाळी ७:०० ते मध्यरात्री १२:०० दरम्यान वाहतुकीसाठी तुकीसाठी खुला असतो. परंतु, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला राहील.

२.७ मीटरचा सायकल ट्रॅक, विविध सोईसुविधा

कोस्टल रोडच्या विहारपथासह पालिका २.७ मीटर लांबीचा सायकल ट्रॅक आणि विविध सोईसुविधा उपलब्ध करून देणार आहे. सागरी किनाऱ्याचे निसर्गसौंदर्य पाहता यावे, यासाठी आसनांची व्यवस्थाही केली आहे. उपलब्ध जागेनुसार विविध फुल झाडे, शोभेची झाडे तसेच समुद्र किनारी वाढू शकतील, अशी झाडे लावली आहेत.

विनामूल्य प्रवेश 

विहार पथावर प्रवेश विनामूल्य आहे. तेथे जाण्यासाठी बांधलेल्या भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा आहे. भुयारी मार्ग क्र. ४ येथे येण्यासाठी भुलाभाई देसाई मार्गावरील आकृती पाकिंग इमारत येथून प्रवेश आहे. भुयारी मार्ग क्र. ६ येथे येण्यासाठी वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन) येथून प्रवेश असेल. भुयारी मार्ग क्र. ११ येथे येण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्धशाळेसमोर प्रवेश असणार आहे. भुयारी मार्ग क्र. १४ येथे येण्यासाठी वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौक येथून जाता येणार आहे. 

टॅग्स :मुंबई